मेरा युवा भारत रत्नागिरीतर्फे आयोजित गुहागर तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव

गुहागर प्रतिनिधी

मेरा युवा भारत, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित गुहागर तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवात तालुक्यातील युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले.
या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते श्री. चंद्रकांत झगडे, देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागरच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे मॅडम, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील, अपग्रेड मुख्याध्यापक ईश्वर वसावे, गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, क्रीडा शिक्षक श्री. निलेश गोयथळे, तसेच क्रीडा पंच श्री. कृपाल परचूरे, श्री. नाईक, श्री. गमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवामध्ये युवकांसाठी वैयक्तिक क्रीडा प्रकारांत २०० मीटर धावणे व जुडो या स्पर्धांचा समावेश होता. युवतींसाठी रस्सीखेच, २०० मीटर धावणे व लांब उडी अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. युवकांसाठी सांघिक खेळ कबड्डी तरी युवतींसाठी सांघिक खेळ रस्सीखेच हे खेळ प्रकार होते. सर्वच स्पर्धांना सहभागी खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विजेता स्पर्धकांना मेडल प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे मॅडम म्हणाल्या की, खेळामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
प्रमुख अतिथी शिक्षक नेते श्री. चंद्रकांत झगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आज क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत असून, खेळाच्या माध्यमातून युवकांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात निश्चितच मोठी प्रगती साधता येऊ शकते.
या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक-युवतींना आपल्यातील क्रीडा गुण प्रदर्शित करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले. स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह, क्रीडाप्रेम आणि खिलाडूवृत्ती यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले होते.