प्रदूषण मंडळाचा ‘कारणे दाखवा’ दणका; सहदेव पिटले यांच्या तक्रारीची दाखल
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील चिंचघर खोतवाडी येथे लोकवस्तीच्या परिसरात सुरूअसलेल्या ग्रॅव्हिटी फूडस या बेसन, गूळ पावडर व इतर पीठ तयार करणाऱ्या उद्योगाच्या ग्राइंडिंग मशीनमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार सहदेव कृष्णा पिटले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मंडळाने संबंधित उद्योगाला बंद करण्यासह विज व पाणी पुरवठा खंडित का करण्यात येऊ नये, असा सवाल उपस्थित केला आहे.
चिंचघरी खोतवाडी येथील प्लॉट – क्रमांक ७८२ मध्ये ग्रॅव्हिटी फूडस हा उद्योग सुरू आहे. या उद्योगाचे मालक सूरज कोळी व भागीदार अरुण अंबाजी सकपाळ यांच्या घरातील पत्राच्या शेडमध्ये ताडपत्री लावून ग्राइंडिंग मशीनच्या साहाय्याने बेसन, गूळ पावडर आणि अन्य पीठ तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पिटले यांनी तक्रारीत म्हटले आहे. या मशीनचा मोठा आवाज होत आहे. शेजारी राहणाऱ्या कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागासाठी निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा हा आवाज दुप्पट असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आवाजामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, रक्तदाबाचा त्रास वाढत आहे. मुलांना अभ्यास करतानाही अडचणी येत आहेत. राहण्यासाठी घेतलेल्या घरात अशा प्रकारे औद्योगिक व्यवसाय सुरू करण्यात आल्याने रहिवाशांचे जगणं कठीण झाले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे उपप्रदेश अधिकारी, चिंचघरी ग्रामपंचायत अधिकारी, तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. पंचायत समिती सभापती यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, २५ दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असे श्री. पिटले यांनी म्हटले आहे.












