खेड (प्रतिनिधी) : शिवसेना संघटनेत सोशल मीडिया माध्यम अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आरफात मुमताज अब्दुलगणी सुर्वे यांची खेड शिवसेनेच्या सोशल मीडिया पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी खेड नगर परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीदरम्यान दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आरफात सुर्वे यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या.
शिवसेना पक्षाची भूमिका, पक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती, शासनाच्या योजनांचा प्रचार-प्रसार तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्याची माहिती सोशल मीडिया माध्यमातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर असणार आहे. खेड शहर व परिसरात शिवसेनेच्या सोशल मीडिया कार्याला अधिक गती देण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सोशल मीडिया हे जनतेशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम बनले असून, पक्षाचे विचार, विकासकामे आणि संघटनात्मक उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा आढावा प्रमुख शशिकांत चव्हाण, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख सर्फराज पांगारकर, शमशुद्दीन खान, खेड नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरफात सुर्वे यांच्या नियुक्तीमुळे खेड शिवसेनेच्या सोशल मीडिया संघटनात्मक कार्याला बळ मिळणार असून, पक्षाचे उपक्रम, भूमिका आणि जनहिताची कामे सोशल मीडिया माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.












