सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन पोलीस सुपुत्रांना कांस्यपदक

२७ व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत स्वस्तिक सावंत आणि जितेंद्र सावंत यांचे यश

कणकवली : हैदराबाद येथील रंगारेड्डी सीआरपीएफ कॅम्पमध्ये नुकत्याच पार पडलेल्या २७ व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन पोलीस सुपुत्रांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रतिनिधित्व करणारे स्वस्तिक सुनील सावंत आणि जितेंद्र सुरेश सावंत यांनी या स्पर्धेत कांस्यपदक पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 

स्वस्तिक सुनील सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून ते कणकवली तालुक्यातील तरंदळे गावचे मूळ रहिवासी आहेत. तर जितेंद्र सुरेश सावंत हे मुंबई पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून ते कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे सुपुत्र आहेत.

 

देशभरातील विविध राज्यांच्या पोलीस पथकांनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करत दोन्ही सावंत यांनी आपल्या कौशल्याची आणि मेहनतीची छाप उमटवली. त्यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढला असून जिल्हा पोलीस दलासह जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या यशामुळे तरंदळे आणि नरडवे गावांसह संपूर्ण कणकवली तालुक्याची मान उंचावली आहे.