गारगोटीत ३० बेडच्या अत्याधुनिक शासकीय नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण; १९ कोटींच्या कॅथलॅब कामाचा शुभारंभ!

प्रतिनिधी/रोहन कांबळे

 

राधानगरी : भुदरगड तालुक्यातील आरोग्य सुविधांना अधिक बळकटी देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडणार असून, गारगोटी येथे ३० बेडच्या अत्याधुनिक शासकीय नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण रविवार दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. तसेच अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला आहे. या कॅथलॅबसाठी तब्बल १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेले शासकीय नेत्र रुग्णालय आधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असणार आहे. ३० बेडची सुविधा उपलब्ध होणार असल्याने नेत्रविकारांवरील उपचारांसाठी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रोपचाराच्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

याच कार्यक्रमात १९ कोटी रुपये निधी मंजूर झालेल्या अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला आहे. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित उपचारांसाठी आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दिशेने गारगोटीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण आणि अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ यामुळे भुदरगड तालुक्यासह परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गारगोटीच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला.

दरम्यान,या सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.