कोकणची तहान न भागता पाणी कुठेही जाणार नाही!

हापूसच्या मानांकनासाठी कायदेशीर लढाई लढणार; आमदार शेखर निकम यांची ठाम भूमिका
कोकणातील पाणीप्रश्न विधानसभेत मांडणार; हापूसचे भौगोलिक मानांकन कोकणापुरतेच मर्यादित ठेवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचे आवाहन

चिपळूण (प्रतिनिधी) : कोयना धरणातील पाणी मुंबईला नेण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील जनतेची तहान भागल्याशिवाय कोयनेचे पाणी कुठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार शेखर निकम यांनी मांडली आहे. कोकणातील गावांची पिण्याच्या पाण्याची गरज, शेतीसाठी सिंचन आणि स्थानिक पाणीपुरवठ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडविल्यानंतरच अतिरिक्त पाणी अन्यत्र वळविण्याचा विचार व्हावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कोकणच्या हापूस आंब्याचे भौगोलिक मानांकन कायम राखण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

चिपळूण -गुहागर बायपास रोडच्या कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, कोयना धरणातील पाणी थेट मुंबईला नेण्याच्या प्रस्तावाबाबत प्राथमिक माहिती मिळाली असली, तरी या संदर्भातील अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, कोकणातील अनेक गावांना आजही पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा गावांपर्यंत प्रथम पाणी लिफ्टिंग करून पोहोचविणे गरजेचे आहे. स्थानिक जनतेच्या पाण्याच्या गरजा पूर्ण न करता कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविणे योग्य ठरणार नाही, असे निकम यांनी नमूद केले.

या दृष्टीने पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आयआयटीकडे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. कोकणातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले असून, पुढाकार घेतल्याबद्दल जलसंपदा विभागाचेही आभार मानले.

पाणी लिफ्टिंग करताना विजेचा खर्च कमीत कमी कसा राहील, याचाही विचार होणे आवश्यक आहे. धामणवणे आणि टेरव यांसारख्या भागांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच या पाण्याचा उपयोग खालच्या गावांमधील नळपाणी योजनांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीच्या सिंचनासाठी जास्तीत जास्त कसा करता येईल, यावर भर देण्यात येणार आहे. कोकणातील पाणीटंचाई आणि शेतीचे प्रश्न लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण विषय आगामी विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे मांडणार असल्याचेही आमदार निकम यांनी स्पष्ट केले.

हापूसच्या मानांकनासाठी कोकण एकवटण्याची गरज

दरम्यान, कोकणच्या अस्मितेशी जोडलेल्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनाचा प्रश्नही आमदार निकम यांनी उपस्थित केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील हापूस आंब्याला मिळालेल्या भौगोलिक मानांकनाच्या कक्षेत वलसाड आणि जुन्नर यांचा समावेश करण्यासंदर्भात सुरू असलेल्या हालचालींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

कोकणच्या हापूस आंब्याला विशिष्ट चव, सुगंध, दर्जा आणि स्वतंत्र भौगोलिक ओळख आहे. या वैशिष्ट्यांमुळेच कोकणच्या हापूसला देश-विदेशात विशेष प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यामुळे या आंब्याचे वैशिष्ट्य आणि भौगोलिक ओळख जपण्याबरोबरच स्थानिक आंबा उत्पादकांचे हित सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित नसून कोकणच्या आर्थिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी निगडित आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

हापूसच्या मानांकनाचा प्रश्न कायदेशीर स्वरूपाचा असल्याने कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. या विषयात राजकारण न करता कोकणच्या आंबा उत्पादकांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

कोकणच्या हापूस आंब्याचे भौगोलिक मानांकन कायम राखण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर लढाई लढण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कोकणच्या पाण्याचा हक्क आणि हापूस आंब्याची स्वतंत्र ओळख या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. कोकणातील जनतेच्या मूलभूत गरजा, शेतकऱ्यांचे हित आणि प्रादेशिक अस्मिता यांना प्राधान्य देत हे दोन्ही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.