‘ए.आय.’, स्मार्ट स्ट्रीट लाईट, हवेतून पेट्रोल निर्मिती आणि केमिकललेस भाजीपाला यांसारख्या प्रयोगांनी वेधले लक्ष; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळाले व्यासपीठ
खेड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सृजनशीलता, कल्पनाशक्ती आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) यांच्या भडगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर एकूण ५८ वैज्ञानिक प्रतिकृती सादर करून आपल्या कल्पकतेची आणि विज्ञाननिष्ठ विचारांची झलक दाखवली.
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) आणि कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावी अशा दोन गटांत हे प्रदर्शन भरविण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जेसीआय खेडचे अध्यक्ष मधुर माधव पेठे आणि उपाध्यक्ष हेमंत चिखले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, परीक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.), स्मार्ट तंत्रज्ञान, कृषी पद्धती, पाणी व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम आणि आधुनिक विज्ञानावर आधारित विविध प्रतिकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृतींची माहिती उपस्थितांना देत त्यामागील वैज्ञानिक संकल्पना, उपयोग आणि भविष्यातील शक्यता समजावून सांगितल्या.
इयत्ता सहावी ते आठवी या गटातील प्रतिकृतींचे परीक्षण एस.एम. इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका आयेशा सांगले आणि श्री. रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगावचे सहाय्यक शिक्षक विजय श्रीधर शिंदे यांनी केले. तर इयत्ता नववी ते बारावी गटातील प्रतिकृतींचे परीक्षण ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), मोरवंडे-बोरजचे सहाय्यक शिक्षक राजेश किटटद आणि अनन्या दळवी यांनी केले.
इयत्ता सहावी ते आठवी गटात इयत्ता सहावीतील हिमांशू कुलकर्णी याने सादर केलेल्या ‘ए.आय.’ या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता सहावीतील नीतिशा खेडेकर आणि आराध्या भोसले यांच्या ‘स्मार्ट स्ट्रीट लाईट’ प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. इयत्ता आठवीतील श्रेया गीते आणि स्नेहा कदम यांच्या ‘इंडिजिनस ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस’ या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता आठवीतील स्वराज तांबे आणि राज देशमुख यांच्या ‘वॉटर डिस्पेन्सर’ प्रतिकृतीला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
इयत्ता नववी ते बारावी गटात इयत्ता अकरावी सीईटीमधील हर्ष थळकर आणि रोशनअली शेख यांच्या ‘ए.आय. फॉर बेटर लाईफ’ या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता अकरावी विज्ञान सीईटीमधील मयुरेश भाट आणि तनिष काणेकर यांच्या ‘ए.आय.’ प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. इयत्ता नववीतील सोहम मोहिते आणि हर्ष बांगर यांच्या ‘मेकिंग पेट्रोल फ्रॉम एअर अँड वॉटर’ या नाविन्यपूर्ण प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला. तर इयत्ता अकरावी जेईईमधील आर्य चिले आणि स्वरूप कांचनकोटी यांच्या ‘केमिकललेस व्हेजिटेबल’ या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला चालना देणाऱ्या या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी रागिणी जामकर, माधुरी लेले, साधना थोरात, मानसी मनवळ आणि दीपक यादव यांनी विशेष मेहनत घेतली.
या विज्ञान प्रदर्शनाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे, सल्लागार मंडळ सदस्य तसेच ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन भविष्यात संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.













