गुहागर तालुक्यातील वेळंब येथे सापडले बिबट्याचे पिल्लू

वनविभागाकडून यशस्वी बचाव कार्य; पिल्लू सुस्थितीत

गुहागर : प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील मौजे वेळंब (नालेवाडी) येथील शृंगार तळी ते अबलोली रस्त्याच्या कडेला आढळून आलेल्या बिबट्याच्या मादी पिल्लास वनविभागाच्या पथकाने आज सुरक्षित रित्या बचाव कार्य करून ताब्यात घेतले आहे. सदर पिल्लाचे वय अंदाजे चार ते पाच महिने असून ते सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे.
आज सकाळी शृंगार तळी ते अबलोली रस्त्याच्या बाजूला बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती श्री. बाळकृष्ण ओक यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत काळजीपूर्वक बचाव मोहीम राबवून पिल्लास सुरक्षित ताब्यात घेतले.
पिल्लास ताब्यात घेतल्यानंतर पशुधन विकास अधिकारी (जाणवले) यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीअंती हे पिल्लू मादी असून त्याचे वय अंदाजे ४ ते ५ महिने असल्याचे आणि ते सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले.
हे बचाव कार्य विभागीय वनाधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (चिपळूण) एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनपाल (गुहागर) श्री. अमित निमकर, वनरक्षक (रानवी) श्री. गायकवाड, वनरक्षक (अडूर) श्री. मांडवकर आणि वनरक्षक (अबलोली) श्री. पवार यांनी सहभाग घेऊन यशस्वी कामगिरी बजावली.