प्रकल्पाचे संभाव्य दुष्परिणाम, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांच्या हक्कांवर सविस्तर चर्चा; लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे आवाहन
दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील वणौशी (भिवबंदर)–आघारी परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी रविवारी २३ नोव्हेंबर रोजी वणौशी येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. वणौशी तर्फे पंचनदी आणि दुमदेव गावातील अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या सभेत प्रस्तावित प्रकल्पाचे संभाव्य पर्यावरणीय आणि सामाजिक दुष्परिणाम, स्थानिक जनतेचे हक्क, गावांचे भवितव्य तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी एकजुटीने उभे राहून लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सभेला पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते भावेश अरुण कारेकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, स्थानिक जनतेचे अधिकार, विकासाच्या नावाखाली होणाऱ्या प्रकल्पांचे संभाव्य परिणाम आणि आपल्या गावाच्या भवितव्याबाबत जागरूक राहण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. कोणताही प्रकल्प राबवताना स्थानिक जनतेच्या भावना, मते, संमती आणि हित यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.
भावेश कारेकर यांनी यावेळी आपल्या मांदिवली गावातील प्रस्तावित खाण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांना एकत्रित करून शासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या आणि त्याचा पाठपुरावा केल्याचा अनुभव सांगितला. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षातून महिन्याभरात प्रस्तावित खाण प्रकल्प रोखण्यात यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. गावातील नागरिक एकत्र आले आणि आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहिले, तर लोकशाही मार्गाने प्रभावी लढा उभारता येतो, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भातील वस्तुस्थिती, तेथील अनुभव आणि अणुऊर्जा प्रकल्पांबाबतच्या विविध बाबींची माहिती देण्यासाठी शाश्वत कोकण टीमचे सचिन चव्हाण आणि योगेश कांबळे उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून प्रकल्पाच्या संदर्भातील विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. पर्यावरणप्रेमी पंकज दळवी यांनीही वेळात वेळ काढून सभेला उपस्थिती लावली.
सभेत ग्रामस्थांच्या विविध शंका, प्रश्न आणि चिंतांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण, समुद्रकिनारी असलेली नैसर्गिक संपत्ती, स्थानिकांच्या उपजीविकेची साधने, शेती, मासेमारी आणि गावांच्या अस्तित्वावर संभाव्य परिणाम होऊ शकतात, अशा मुद्द्यांवर ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे, प्रकल्पासंदर्भातील माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देणे आणि ग्रामस्थांच्या मतांचा आदर करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गावाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि स्थानिक जनतेचे हक्क जपण्यासाठी ग्रामस्थांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले. आपल्या गावाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, कोणत्याही प्रश्नावर लोकशाही मार्गाने एकजुटीने लढा देणे ही काळाची गरज असल्याचे सभेत अधोरेखित करण्यात आले.
या सभेला अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक घडशे, पांडुरंग दवंडे, उपाध्यक्ष अशोक जाधव व दिनेश गुरव, सचिव अनिष निंबकर, प्रशांत दवंडे व मनीष चव्हाण, उपसचिव रुपेश कुटरेकर व प्रमोद गमरे यांच्यासह वणौशी, दुमदेव तसेच मुंबई येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
सभेच्या शेवटी निमंत्रित मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कारही करण्यात आला. कोकणची निसर्गसंपदा, गावांचे अस्तित्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक जनतेचे हक्क जपण्यासाठी प्रस्तावित भिवबंदर–आघारी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एकजुटीने उभे राहून लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार या जनजागृती सभेत ग्रामस्थांनी व्यक्त केला.













