जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना निसर्गरम्य पारपोलीची भुरळ

पारपोलीला भेट देत तेथील निसर्गाचा लुटला आनंद : छायाचित्रणाचाही आवरला नाही मोह

आंबोली । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील तसेच आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गसुंदर पारपोली’ची मोठी भुरळच पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना पडली आहे. गेल्या सलग दोन विकेंडना डॉ. दहिकर यांनी पारपोलीला भेट देत तेथील निसर्ग पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेतला. त्यामुळे श्री. दहिकर यांच्या भेटीमुळे दुर्लक्षित पारपोलीच्या निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त होतं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच पारपोलीला डॉ. दहिकर यांनी भेट दिली होती. त्यावेळी तेथील निसर्गसौंदर्याने प्रभावित झालेल्या डॉ. दहिकर यांनी रविवारी पुन्हा आपल्या सहकाऱ्यांसह पारपोलीच्या जंगलात तीन ते चार तासांची जंगलभ्रमंती केली. यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सावंतवाडीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी वनविभागाचे रेस्क्यू पथक उपस्थित होते. यावेळी जंगल भ्रमंतीदरम्यान जंगलातील समृद्ध जैवविविधतेचा त्यांनी जवळून अनुभव घेतला.

यावेळी जंगलातील विविध औषधी वनस्पती, दुर्मिळ वृक्ष, वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा, दुर्मिळ कीटक, वारुळांचे विविध प्रकार तसेच अतिदुर्मिळ खवले मांजराच्या पाऊलखुणांबाबत पारपोलीतील गाईड राजेश कविटकर, देवसू वनपरीमंडलचे वनपाल मेहबूब नाईकवडे आणि वनरक्षक रोहित माळी यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच ह्या जंगलभ्रमंतीनंतर डॉ. मोहन दहिकर म्हणाले, “अतिशय सुंदर परिसर आहे आणि मॉडरेट स्वरूपाचा छान ट्रेक आहे. तसेच फुलपाखरांचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या पारपोलीतील हे ट्री हाऊस आकर्षक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन फुलपाखरांची तसेच एकूणच निसर्गाची ओळख करून घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

सह्याद्रीच्या कुशीत तथा आंबोलीच्या पायथ्याशी असेलेल्या पारपोली हे गाव जैवविविधतता तसेच निसर्ग व वन्यजीव पर्यटना बाबतीत पर्यटकांसोबतच निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठीही सद्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पारपोली हे एक सर्वाधिक आकर्षणाचे निसर्ग व वन्यजीव पर्यटनाचे ठिकाण बनेल. सोबतच स्थानिक ग्रामस्थ हे पारपोलीच्या निसर्ग पर्यटनाला निश्चितच नवी दिशा देतील. हे निश्चितच!