मोबाईलच्या आभासी जगापेक्षा पुस्तकांचे बोट धरून समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवा : डॉ. शोभा नाईक

ओणी येथे एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संतोष मोंडे, राजापूर: आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचे आकर्षण वाढत असले, तरी मुलांनी मोबाईलपासून दूर राहून चांगल्या लेखकांच्या पुस्तकांचे बोट धरावे. साहित्यामुळेच आपली मातृभाषा टिकते आणि व्यक्तिमत्त्व घडते. त्यामुळे केवळ परीक्षार्थी न राहता, खऱ्या अर्थाने विद्यार्थी बनून जगातील एक सुंदर आणि संवेदनशील माणूस घडवणे हेच प्रत्येक शाळा, शिक्षक आणि पालकांचे ध्येय असायला हवे, असे प्रतिपादन बेळगाव येथील नामवंत साहित्यिका डॉ. शोभा नाईक यांनी येथे केले.
ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी येथे एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन सोमवारी डॉ. शोभा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. नाईक यांनी बेळगाव आणि कोकण यांच्यातील सांस्कृतिक नात्याचा आवर्जून उल्लेख केला. बेळगावमध्ये मराठी शाळा टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना, कोकणात मात्र मुले आपल्याच मातृभाषेतून शिक्षण घेत आहेत, हे त्यांचे मोठे भाग्य आहे, असे सांगत त्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. मराठी भाषेला मिळालेला ‘अभिजात भाषा’ हा दर्जा तिच्या प्राचीन आणि समृद्ध ज्ञानपरंपरेची शासकीय मोहोर असल्याचे त्या म्हणाल्या.
लहान मुलांमधील उपजत प्रतिभेचे महत्त्व सांगताना डॉ. नाईक यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या एका प्रसंगाचा तसेच प्रसिद्ध जपानी बालकादंबरी ‘तोत्तोचान’चा दाखला दिला. त्या म्हणाल्या की, प्रत्येक मूल ही निसर्गाची सुंदर निर्मिती असते. मोठ्या माणसांनी मुलांवर आपल्या चौकटी न लादता, त्यांच्यातील प्रतिभेला खतपाणी घालावे. आज पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधणे आणि त्यांना समजून घेणे काळाची गरज आहे. कोकणाला बालसाहित्यिकांची मोठी परंपरा लाभली असून मुलांनी किमान चार कोकणातील बालसाहित्यिकांची पुस्तके वाचावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. शोभा नाईक व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्षस्थान कणकवली येथील सुप्रसिध्द कवी अजय कांडर यांनी भुषविले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एड. वासुदेव तुळसणकर, प्रसिध्द बालसाहित्यीक मदन हजेरी, संस्था कार्यवाह एड. गुरूदत्त खानविलकर, कार्याध्यक्ष प्रदिप संसारे यांसह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद मिरगुले यांनी केले, तर संस्थाध्यक्ष एड. वासुदेव तुळसणकर यांनी संस्थेचा परिचय करून देताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अजय कांडर म्हणाले की, साहित्य म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसते, तर माणसाला समजून घेणारा तो एक जिवंत संवाद असतो. आजच्या मुलांनी पुस्तकांबरोबरच माणसंही वाचायला शिकले पाहिजे. पुस्तक आणि माणूस हे दोन्ही वाचता आले, तरच जीवनात चांगलं काय आणि वाईट काय याचा विवेक जागा राहतो.
आजच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या युगावर भाष्य करताना कांडर म्हणाले की, “कोणतीही नवीन गोष्ट वाईट नसते, मात्र त्यातील चांगले-वाईट ओळखण्याची दृष्टी पालकांनी मुलांना द्यायला हवी. आज आपण फक्त ‘शिक्षित’ झालो आहोत, पण ‘सुशिक्षित’ झालेलो नाही. सुशिक्षित होणे म्हणजे आपला विवेक जागृत ठेवणे. मुलांशी संवाद साधण्यासाठी पालकांनी स्वतः लहान मूल होऊन त्यांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत, मौखिक परंपरेशी त्यांची नाळ जोडली पाहिजे.”
मुलांना लेखनासाठी प्रोत्साहन देताना कांडर यांनी सांगितले की, प्रसिद्धी किंवा पुरस्कार मिळवण्यासाठी कधीही लिहू नका, कारण पुरस्कारांतून माणसे मोठी होत नाहीत, तर ती त्यांच्या गुणवत्तेतून मोठी होतात. कोणत्याही क्षेत्रात नवी निर्मिती करायची असेल, तर आपल्या मातीतील साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा माहीत असणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी कोकणातील ज्येष्ठ बालसाहित्यिक मदन हजेरी तसेच ‘खेळगडी’, ‘किशोर’ यांसारख्या नियतकालिकांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
एका ग्रामीण भागातील शाळेने ‘गांधी आणि आंबेडकर समजून घेताना’ यासारख्या विषयावर व्याख्यानमाला व बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
संमेलनाची सुरूवात सुप्रभा वाचनालय, कोंडिवळे ते नूतन विद्यामंदिर अशी ग्रंथ दिंडी काढून करण्यात आली. सुत्रसंचालन प्रा. विकास पाटील यांनी केले. तर आभार डॉ. शैलेंद्र शिंदेदेसाई यांनी मानले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात बालसाहित्यिक मदन हजेरी यांची प्रकट मुलाखत, तसेच कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.