डेरवणच्या वालवलकर रुग्णालयात चार यशस्वी ऍन्युरिझम शस्त्रक्रिया

​चिपळूण : वालवलकर रुग्णालय आणि ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यूरोसर्जरी विभागाने अवघ्या चार आठवड्यांच्या कालावधीत चार गुंतागुंतीच्या मेंदूतील ऍन्युरिझम (Aneurysm) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी कोकणातील अत्याधुनिक मेंदूशस्त्रक्रियेच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा ठरली असून सर्व रुग्ण पूर्णपणे बरे होऊन आपल्या दैनंदिन जीवनात परतले आहेत.

​या सर्व शस्त्रक्रियेमध्ये न्युरोनॅव्हिगेशन या अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अतिशय अचूक मायक्रोसर्जिकल तंत्राचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील गुंतागुंत कमी होऊन शल्यचिकित्सकांना मिलीमीटरच्या अचूकतेने काम करता आले.

​या सर्व शस्त्रक्रियांचे नेतृत्व प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांनी केले. तर भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर व त्यांच्या टीमने भूल व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. मेंदूतील रक्तवाहिन्या कमजोर होऊन फुगण्यामुळे ऍन्युरिझम तयार होतो, जो फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होऊन जीवघेणा प्रसंग उद्भवू शकतो. अचानक होणारी तीव्र डोकेदुखी किंवा उलट्या यांसारखी लक्षणे कोणत्याही वयोगटात गंभीरतेने घ्यावी लागतात, कारण लवकर निदान हेच उपचारांतील यशाचे गमक आहे.

​या चार शस्त्रक्रियापैकी एक उल्लेखनीय प्रकरण ११ वर्षीय मुलाचे होते, ज्याला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. स्कॅनिंगमध्ये अत्यंत गुंतागुंतीचा मेंदूतील ऍन्युरिझम आढळला. त्वरेने निदान आणि शस्त्रक्रिया केल्याने त्याचा जीव वाचला आणि तो आता पूर्णपणे बरा आहे.

​रुग्णालयाच्या संचालिका सौ. सुवर्णा पाटील यांनी माहिती दिली की, ही सर्व शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना अंतर्गत पार पडली. या योजनेमुळे पूर्वी उच्चवर्गाला मर्यादित असलेली प्रगत वैद्यकीय सुविधा आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत.