कोलगाव येथे २७ नोव्हेंबरला श्री देव कलेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव

कोलगाव येथील श्री देव कलेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी देवाला अभिषेक करण्यात येणार असून, भाविकांना नारळ ठेवण्याची संधी उपलब्ध असणार आहे. रात्री १२ वाजता ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिराभोवती पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या जत्रोत्सवाचा भाविकांनी व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.