दोडामार्गात ‘नशामुक्त युवा’ कार्यक्रमाचे उद्या बुधवारी आयोजन

दोडामार्ग : प्रतिनिधी
युवा पिढीमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण व्हावी, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम समाजाच्या उभारणीत योगदान द्यावे, या उद्देशाने दोडामार्ग येथे ‘नशामुक्त युवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग, मेरा युवा भारत आणि दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा जनजागृतीपर कार्यक्रम दोडामार्ग ज्युनिअर कॉलेज येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

आजच्या काळात व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण ही समाजासमोरील गंभीर समस्या बनत आहे. विशेषतः युवा पिढीला व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे, त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजवणे आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे, ही या उपक्रमामागील प्रमुख भूमिका आहे.

युवा शक्ती ही देशाच्या विकासाची खरी ताकद असून, ही शक्ती व्यसनांपासून दूर राहून विधायक कार्याकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांना समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी, समाजसुधारक, माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीच्या या चळवळीला पाठबळ द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.