बांद्यात २९ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

इन्सुली उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

बांदा : प्रतिनिधी

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने बांदा येथे कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह तब्बल ३८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रमोद अशोक निर्मळ (२७, रा. शिरोळ, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर बांदा कट्टा कॉर्नरवर मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

 

गोव्याकडून बांद्याच्या दिशेने येणाऱ्या टाटा इंट्रा (क्र. MH-09-GJ-8235) या गाडीची तपासणी केली असता मागील हौद्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँड असलेले एकूण २४० पुठ्ठ्याचे बॉक्स (१०,०५० बाटल्या) आढळून आले. अंदाजे २८ लाख ८० हजार रुपये किमतीचा दारूसाठा आणि १०लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण अंदाजे ३८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उप आयुक्त स्नेहलता नरवणे आणि सिंधुदुर्गच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकामध्ये दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी तसेच जवान दिपक वायदंडे, संदीप कदम, सागर सुर्यवंशी, सतिश चौगुले आणि अभिषेक खत्री यांचा समावेश होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.