अक्कलकोट श्री.वटवृक्ष स्वामींच्या गाभाऱ्यात पारंपारीक कार्तिक दीपोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा.

चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश महाराज पुजारी यांच्या हस्ते संपन्न झाली स्वामींची शेजआरती.

श्रीशैल गवंडी | अक्कलकोट अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या गाभाऱ्यात सोमवारी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त कार्तिक दीपोत्सव मोठ्या भक्ती भावाने

भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने स्वामींचा गाभारा उजळून निघाला होता.

यावेळी पुरोहित मोहनराव पुजारी व मंदीर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या अधिपत्त्याखाली स्वामींच्या मूर्तीला आकर्षक फुलांची आरास, लालवस्त्र, अलंकार व मुकुटाने सजविण्यात आले होते. गाभाऱ्यातील चांदीच्या स्वामी मुर्तीवर दिव्यांचा प्रकाश पडून संपूर्ण गाभारा सोन्यासारखा झळकत होता. दोन्ही बाजूला समया, निरांजन व दीपमाळांनी गाभाऱ्याला दिव्य तेज प्राप्त झाले होते.

संध्याकाळी पुरोहित मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश महाराज पुजारी यांच्या हस्ते विधिवत शेज आरती संपन्न झाली. मंत्रघोष, घंटानाद व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. शेज आरतीवेळी स्वामींना दीप अर्पण करण्यात आले.

कार्तिक पौर्णिमा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा पर्व. या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व आहे. स्वामींच्या सानिध्यात दीपोत्सव व शेज आरतीचा सोहळा अनुभवताना लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक भाविकांसह सर्वांनी या भक्तिमय सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. दीपोत्सवानंतर व शेज आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी,

श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीपाद सरदेशमुख, ऋषिकेश लोणारी आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.