देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील पूर येथे अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारी गाडी उलटल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, गुरांच्या अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ताम्हाणे येथून बोलेरो पिकअप गाडी विनापरवाना दोन बैल भरून कुडवली मार्गे देवरूख व तेथून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. ही गाडी पूर येथे आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्यानंतर एका बैलाला दुखापत झाली. तर गाडीतील एकजण जखमी झाला आहे. गुरांची वाहतूक करणारी गाडी पलटी झाल्यावर या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी या अपघाताची खबर देवरूख पोलीसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन रितसर पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देवरूख पोलीस ठाण्यात सुरू होती.













