खेड तहसील कार्यालयासमोर सुनील जाधव यांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रकृती खालावली

खेड (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवरे येथील रेशन दुकान क्र. ४३ च्या बेकायदेशीर कारभाराविरोधात आणि प्रशासकीय अनास्थेच्या निषेधार्थ २ ऑक्टोबरपासून सुरू झालेले उपोषण आज चौथ्या दिवशीही कायम आहे. ऐनवरे येथील रहिवासी सुनील बाबुराव जाधव हे खेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐनवरे येथील रेशन दुकानाचे चालक सुरेश गोपाळराव जाधव हे शासकीय नियमांचे उघडपणे उल्लंघन करून स्वतःच्या राहत्या घरातून रेशन दुकान चालवत आहेत. या बेकायदेशीर कारभारावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सुनील जाधव यांनी यापूर्वी १५ ऑगस्ट २०२६ रोजी उपोषण केले होते. त्यावेळी खेड तहसील कार्यालयाने कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप कोणतीही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने आणि संबंधित पुरवठा अधिकारी दोषी दुकानदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत जाधव यांनी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तापासून पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
सतत चार दिवसांपासून अन्न-त्याग केल्यामुळे उपोषणकर्ते सुनील जाधव यांची प्रकृती खालावू लागली आहे. पुरवठा अधिकारी आणि परवानाधारक यांनी खरी माहिती लपवून दिशाभूल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बेकायदेशीर रेशन दुकानाचे परवाना निलंबन किंवा रद्द होईपर्यंत तसेच दुकान स्वतंत्र जागेत स्थलांतरित होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार जाधव यांनी व्यक्त केला आहे. उपोषणादरम्यान काही अघटित घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पुरवठा अधिकारी आणि प्रशासनाची असेल, असा इशारा आधीच देण्यात आला आहे.