‘दिग्पाल’ – म्हणजे सर्व दिशांचा रक्षक!

दशदिशांचा रखवाला! नावात काय आहे? असं शेक्सपियर म्हणायचा. परंतु दिग्पाल लांजेकर या नावातच सर्व काही आहे, असं मला ठाम वाटते. दिग्पाल लांजेकर हे नाव आज जगभरात सुप्रसिद्ध आहे. केवळ मराठी चित्रपट सृष्टीतच नव्हे तर इतरही भाषिक चित्रपट निर्माते दिग्पालचा जागतिक आदरयुक्त दबदबा अनुभवत आहेत.
याच दिग्पाल लांजेकर याने पाच वर्षांपूर्वी शिवराज अष्टक निर्मिती करण्याचा मनसुबा जाहीर केला तेव्हा अनेकांनी त्याला वेड्यात काढले होते. परंतु त्याला ओळखणाऱ्यांनी त्याला त्या क्षणापासून पाठींबा दिला. दोन मित्र शेजारी निश्चल असताना, रायगडाच्या टकमक टोकावर बसून एकटाकी ‘फर्जंद’ चित्रपटाची पटकथा लिहिणारा दिग्पाल सामान्य असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वरदहस्त त्याला निश्चित लाभला आहे. बालपणापासून शनिवार वाडा हे त्याच्या खेळण्याचे ठीकाण आणि मातृकृपेने गोनिदांसारख्या लेखकांची पुस्तके सोबतीला असलेल्या दिग्पालने एफ्.टी.आय्.आय्. पूर्ण करून व्यावसायिक रंगभूमी व मालिकांतून हातपाय पसरायला सुरुवात केली. परंतु त्याचे मन तिथे रमत नव्हते. विनय आपटे सारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाला ऐतिहासिक मालिकेतील फाईट सीन चुकीचा आहे असं ठामपणे सांगणारा, बालपणीपासून आतापर्यंतच्या सर्व गुरूंचा लाडका, सर्व सहकारी ज्येष्ठ कलावंतांच्या हृदयातला ताईत, सर्व तरुणाईचा दादा… त्याच्याविषयी बोलायला वेगळा लेख लिहावा लागेल.

फर्जंद पाठोपाठ फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेरशिवराज असे चार चित्रपट पूर्ण करून ‘सुभेदार’ या पाचव्या निर्मितीपर्यंत दिग्पाल येऊन पोहोचला. या वेळेपर्यंत त्याला ‘ए. ए. फिल्म्स’ आणि ‘एव्हरेस्ट एंटरटेंन्मेंट’ची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ या चित्रपटाची निर्मिती ‘राजवारसा प्रॉडक्शन्स’, ‘मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि.’,’पृथ्वीराज प्रॉडक्शन्स’, ‘राजाऊ प्रॉडक्शन’, ‘प्रद्योत पेंढरकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर व श्रुती दौंड इतक्या निर्मात्यांचे पाठबळ लाभलं. सोबतीला चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढरकर, पूर्णानंद वांढेकर, बिपीन सुर्वे, श्रीकांत भीडे, उर्मिला जगताप, अनिकेत राजे, निखिल लांजेकर, आदी कलावंतांची फौज तयार होती.

त्यामुळेच सुभेदार ला पहिल्या दिवशी जगभरात एक हजार शोज मिळण्याचा सन्मान मिळाला. मराठी चित्रपटासाठी हा एक विक्रमच म्हणावा लागेल. याचे सारे श्रेय वितरक श्री. अनिल धडानी सरांना जाते. चार दिवसातच जवळपास सहा कोटी उत्पन्नाचा आकडा गाठणं हे चित्रपटाचे निर्विवाद यशच आहे. मायबाप रसिकांना नेमकं काय हवं याची दिग्पालला स्वतःला अतिशय चांगली कल्पना आहे. आजपर्यंत लिहिलेलं कोणतंही गीत लिहायला त्याला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला नाही यावरुन सरस्वतीचा त्याला आशीर्वाद आहे हे निश्चितच!
इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या शाळेतील विषयांचे महत्त्व आपण जसे जसे मोठे होत जातो तसतसं ते जाणवू लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नकळत आपल्या रोमारोमात भिनला जातो. पुढे तो इतिहास प्रपंचात विरळ होत जातो. परंतु दिग्पाल लांजेकर यांनी घेतलेला वसा तो इतिहास आपल्यासमोर हुबेहूब सादर करुन आपल्याला त्या काळात कधी घेऊन जातो तेच कळत नाही.

‘सुभेदार’ ची कथा मराठमोळी सर्व लहानथोर जाणतात. परंतु त्यामागची पार्श्वभूमी माहिती असायला हवी. पुरंदराच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. त्यात कोंढाणा हा किल्ला प्रमुख होता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. कोंढाणा हा किल्ला मुघलांसाठी लष्करी दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण होते. तिथून शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी राजगड केवळ काही मैलांवर दृष्टीपथात होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता येत होते. म्हणून मुघलांनी या किल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. या किल्याचे नेतृत्व उदयभान राठोड या मोघल नियुक्त राजपूत सरदार किल्लेदाराकडे होते. शिवाजी महाराजांना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते. म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते.

कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या पश्चिमेला २५ किमी अंतरावर सुमारे १,४०० मीटर उंचीवर आहे. किल्याला चहुबाजूने खड्या उताराची नैसर्गिक तटबंदी आहे. सरळसरळ युद्ध करून हा किल्ला घ्यायचे असते तर मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते. म्हणून तानाजीने किल्ला चढायची सर्वात कठीण बाजू निवडली. ही कड्याची बाजू असल्याने ह्या जागेवर फारसे सैनिक तैनात केले गेले नव्हते. आज ही जागा तानाजी कडा म्हणून ओळखली जाते. तानाजी, घोरपडे बंधू व काही मावळे हा ९० अंशाचा कडा चढून गेले. वर पोहोचल्यावर तानाजीचे मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई चालू झाली. तानाजी व उदयभानमध्ये द्वंद्व झाले. लढता लढता तानाजीची ढाल तुटली. तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होता. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती. परंतु तानाजी पडलेला पाहून लढाईचे उपसेनानी सूर्याजींनी सुत्रे ताब्यात घेतली. तानाजी पडल्याने मावळ्यांचा धीर सुटला व पळ काढू लागले. परंतु सुर्याजीने कड्याचे दोर कापून टाकले व परतीचे मार्ग बंद केले. मावळ्यांना जिंका किवा मरा असा आदेश दिला. प्रेरित झालेल्या मावळ्यांनी किल्ला सर केला.

चित्रपटाची सुरुवात झोकात होते. मावळ जागं होते आणि आपणही सावरुन बसतो. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अप्रतिम आणि अचंबित करणारी आहे. चित्रमहर्षी राजदत्त म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या चित्रपटाला अशी ट्रिटमेंट पहिल्यांदाच दिली जात आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी राजदत्तनी केलेली भूमिका अंगावर काटा ऊभा करते. त्यांच्या लेकीच्या भूमिकेत ऐश्वर्याने कमाल केली आहे. शेतकरी समाज महाराजांच्या सान्निध्यात येतो आणि चित्रपट चढत्या भाजणीत कसा फुलत जातो हे प्रत्यक्षात अनुभवणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या सगळ्याच कलावंतांनी चित्रपटात जीव ओतला आहे.
छत्रपतींची भूमिका करणारा चिन्मय मांडलेकर महाराजांची अदब कायम राखून असतो. त्याची काश्मीर फाईल्स मधील भूमिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका म्हणजे दक्षिण धृव आणि उत्तर धृव इतका फरक आहे. मृणालताई जिजाऊ जगतात. समीर धर्माधिकारी कोणत्याही भूमिकेत तितकाच सहजपणे वावरतो. तानाजीच्या पत्नाची भूमिका स्मिता शेवाळे जगली आहे. अभिजीतचा सूर्याजी, मृण्मयीची केसर… प्रत्येक कलावंत आपापल्या जागी पूर्ण ताकदीने अभिनय करतो.

सर्वात कमाल केली आहे ती सुभेदार अजय पुरकर यांनी! शेतकरी ते सुभेदार हा प्रवास, मामासोबत आलेला लहान मुलगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवलग मित्र, महारांजांविषयी असलेली निष्ठा, स्वराज्याबद्दल असलेली आत्मीयता आणि प्रेम, बंधुप्रेम, पत्नीप्रेम, मातृप्रेम, जिजाऊंबद्दल असेलेला आदर आणि ममत्व, मावळ्यांबद्दलचा विश्वास, लढाईतील पराक्रम… संपूर्ण अभिनयाचे विद्यालय अजयने उलगडून दाखवले आहे. त्याला त्रिवार मुजरा!
लेखक/दिग्दर्शक/कलावंत याव्यतिरिक्त चित्रपटाचे यश अवलंबून असते त्याच्या पार्श्वसंगीतावर, गाण्यांवर! देवदत्त बाली या केवळ २३ वर्षांच्या संगीतकाराने दिग्पालच्या बोलांना वाद्यांच्या मेळात असे काही लपेटले आहे की रसिक नकळत ताल धरतात. त्याचे भवितव्य उज्वल आहे. दिग्पालचा भाऊ साऊंड इंजिनिअर निखील लांजेकर एखाद्या पहाडासारखा दिग्पालच्या मागे उभा असतो. फोले इफेक्टस् (folay) पासून प्रॉडक्शनची सगळी जबाबदारी शांतपणे हाताळत असतो.

रसिकांनी उत्स्फुर्तपणे दिलेल्या गर्जना, टाळ्या चित्रपटाचे यश वारंवार अधोरेखीत करतात. गंभीर प्रसंगात चित्रपटगृहातील भयाण शांतता रसिकांच्या मनातील गदगद अस्वस्थ करुन जाते. चित्रपटगृहात भगवे झेंडे शेवटच्या गाण्याला फडकवून रसिक जी उत्स्फुर्त दाद देतात त्याला तोड नाही. अनेक बालप्रेक्षक महाराजांच्या वेषात येऊन दाद मिळवून जातात. तर छोटे कलावंत शिवगर्जना देतात तेव्हा संपूर्ण प्रेक्षागृह प्रतिसाद देते.
लेखक म्हणून प्रत्येक शब्दाचे दिग्पालचे वजन जागोजागी जाणवते. तर दिग्दर्शक दिग्पाल तुम्हाला १६७० सालातील छत्रपतींच्या साम्राज्यात घेऊन जातो. मघाशीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक फ्रेम जीवंत आहे. छत्रपतींच्या कालावधीत प्रशासकीय कारभार कशा पद्धतीने चालायचा याची अनेक उदाहरणे दिग्पालने जागोजागी पेरली आहेत. आजच्या राजकारण्यांनी त्यापासून नक्कीच धडा घ्यायला हवा. कारगील युद्धातील रात्रीच्या वेळी चढाई करण्याची आणि सरळ सुळक्यावर चढाई करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची रणनिती वापरण्यात आली होती. हा केवळ योगायोग नाही तर महाराजांची शिकवण अशी देशवासियांच्या रोमारोमात भिनली असल्याचा पुरावा आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर न करता आपापल्या परिने हा चित्रपट सर्वांसमोर कसा जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. किवळे पुणे येथील हॉटेलबाहेर ‘सुभेदार चित्रपटाची तिकिटे दाखवा आणि दहा टक्के सूट मिळवा’ असा बोर्ड पहायला मिळाला. रत्नागिरीसारख्या ठिकाणी सातत्याने हाऊसफुल्ल चालणाऱ्या सुभेदारची तिकिटे मिळत नसल्याने अनेकजण हिरमुसले आहेत. अनेक ठिकाणी प्रयोग संख्या वाढविण्यासाठी आग्रह होत आहे.

शेवटी विजयश्री प्राप्त झाल्यानंतर मुघल निशाण उतरवून भगवा फडकविण्याचा प्रसंग दिग्पालने ज्या पद्धतीने चित्रित केला आहे त्याला तोड नाही. केवळ एक सुसंस्कृत आणि कल्पक दिग्दर्शकच हे करु शकतो. मालुसऱ्यांच्या विवाहात असलेली एक पद्धत का आहे हे दाखविणारा एक प्रसंगही खूप हळवा आहे.
सर्वांनी लवकरात लवकर आपापली तिकिटे बुक करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. आपल्या चित्रपट बघण्याने दिग्पालला पुढील चित्रपटासाठी बळ मिळणार आहे. दिग्पालचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा!
सुहास भोळे.