इन्फिगोचे ‘आपला ब्रँड, आपला माणूस’ अभियान: रत्नागिरीच्या उद्योजकतेला मिळतेय नवी ओळख

रत्नागिरी: “आंब्याशिवाय रत्नागिरीमध्ये आहे तरी काय?” या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आता कृतीतून आणि अभिमानाने उत्तर देण्याची वेळ आली आहे. रत्नागिरीच्या उद्योजकतेला नवी ओळख मिळवून देण्यासाठी आणि येथील स्थानिक ब्रँड्सचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर आणण्यासाठी इन्फिगोने ‘आपला ब्रँड, आपला माणूस’ हे विशेष अभियान सुरू केले आहे.

रत्नागिरीची ओळख केवळ निसर्गसौंदर्य आणि हापूस आंब्यापुरती मर्यादित न राहता, उद्योग क्षेत्रातील जिल्ह्याची प्रगती अधोरेखित करणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. आपल्याच गावातील आणि आपल्याच जिल्ह्यातील माणसाने उभारलेल्या ब्रँड्सचा संघर्ष व यश लोकांपर्यंत पोहोचवून, स्थानिक ब्रँड्स आणि स्टार्टअप्सना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. मॅन्युफॅक्चरिंग, फूड प्रोसेसिंग आणि आधुनिक सेवा क्षेत्रांत स्थानिक ब्रँड्सनी घेतलेली झेप अधोरेखित करून रत्नागिरीची बदलती औद्योगिक आणि व्यावसायिक ओळख या अभियानातून मांडली जाणार आहे.

या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘आपला ब्रँड, आपला माणूस’ हा पॉडकास्ट. या पॉडकास्टच्या माध्यमातून रत्नागिरीतील स्थानिक ब्रँड्सची केवळ ओळख करून दिली जाणार नाही, तर त्यांच्या संस्थापकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. त्यांच्या संकल्पनेपासून ते ब्रँडच्या उभारणीपर्यंतचा संपूर्ण प्रवास, त्यामागील संघर्ष, आव्हाने आणि यशोगाथा रसिकांना व नवउद्योजकांना जाणून घेण्याची संधी यातून मिळणार आहे.