माजी राज्यमंत्री प्रवीणभोसले यांनी सहकुटुंब घेतले सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीचे दर्शन

 

सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सून सौ. निवेदितादेवी आणि पुतणे अजयसिंह यांच्यासमवेत देवीची विधिवत ओटी भरून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी देवीचे गांवकर राजू व बाळा उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा आणि कर्नाटक राज्यातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी माऊलीला नवसाला पावणारी देवी मानले जाते. जत्रोत्सवाच्या निमित्ताने आपला नवस फेडण्यासाठी हजारो भाविकांनी देवीसमोर लोटांगण घालून भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला. या भक्तिमय वातावरणात प्रवीणभाई भोसले यांनी देवीचरणी विशेष प्रार्थना केली. सध्या महाराष्ट्र राज्यात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा गंभीर दुष्काळ पडला आहे, या गंभीर परिस्थितीत राज्य आणि केंद्र शासनाने पूर्ण सतर्कतेने जनतेला सर्वतोपरी सहाय्य करावे आणि राज्यावरील हे दुष्काळाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असे साकडे त्यांनी श्री देवी माऊलीकडे घातले.