गेल्या अनेक वर्षांची लांजा शहरातील नागरिकांची स्वतंत्र फिडरची मागणी पूर्णत्वास
संतोष कोत्रे
लांजा : शहराला वीज पुरवठा करणाऱ्या स्वतंत्र सिटी फिडरचा लोकार्पण सोहळा बुधवारी सायंकाळी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. यामुळे लांजा वासियांचा गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न यामुळे मार्गी लागला आहे.
लांजा शहरासाठी स्वतंत्र विज फिडर नसल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. दिवसातून पंधरा ते वीस वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. रांजण नगरपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेवर याचा परिणाम होत होता. लांजा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका,शाळा, महाविद्यालय दवाखाना आहे. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने लांजा शहरातील नागरिकांसह तालुक्यातून येणाऱ्या ग्रामस्थांची देखील शासकीय कामांचा खोळंबा होत होता.
त्यामुळे लांजा शहरासाठी स्वतंत्र सिटी फिडर मिळावा अशी मागणी सातत्याने येथील नागरिकांतून केली जात होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. त्यानंतर नागरिकांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे हा प्रश्न लावून घरला होता. त्यानुसार आमदार किरण सामंत यांनी यासाठी विशेष प्रयत्न करताना या स्वतंत्र सिटी फिडर साठी सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता.
या लांजा शहराच्या स्वतंत्र फिडरचा लोकार्पण सोहळा आज बुधवारी सायंकाळी पार पडला यावेळी आमदार किरण सामंत यांच्यासह पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, लांजा नगराध्यक्ष सौ सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, प्रसन्ना शेट्ये, राजन देसाई, महावितरणचे अभियंता श्री चव्हाण, माजी नगराध्यक्ष सौ संपदा वाघधरे, यांच्यासह नगरसेवक नगरसेविका आणि नागरिक तसेच महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.













