दरवर्षी स्वखर्चाने १२ ते १५ वनराई बंधाऱ्यांची उभारणी
वन्यप्राण्यांसाठीही जंगलात पाण्याची व्यवस्था
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथील विकास वसंतराव घाग आणि महेश वसंतराव घाग या बंधूंनी गेल्या १६ वर्षांपासून जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात निःस्वार्थपणे योगदान देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने दरवर्षी १२ ते १५ वनराई बंधारे उभारण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढविणे तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. दहिवली बुद्रुकसह परिसरातील अन्य गावांमध्ये आणि रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणीही ते वनराई बंधारे उभारण्यासाठी पुढाकार घेतात. स्वतःचा वेळ, श्रम आणि आर्थिक योगदान देत त्यांनी जलसंवर्धनाचा वसा अखंड सुरू ठेवला आहे. मुक्या जीवांसाठीही माणुसकीचा झरा घाग बंधूंच्या कार्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वन्यप्राण्यांसाठी केलेली पाण्याची व्यवस्था. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने वन्यप्राण्यांची होणारी पाण्यासाठीची भटकंती लक्षात घेऊन ते दुर्गम जंगल परिसरात पाण्याचे डुरे खणतात. त्यामुळे पशुपक्षी आणि वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास मदत होते. त्यांच्या या कार्याची पंचायत समिती चिपळूणच्या वतीने सन २०१५-१६ मध्ये दखल घेऊन प्रशस्तीपत्राद्वारे गौरव करण्यात आला होता. दहिवली परिसरात दहा बंधारे उभारण्यासाठी केलेले सहकार्य आणि वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या कार्याचा त्यात विशेष उल्लेख होता.
तत्कालीन सरपंच रुपेश रविंद्र घाग यांनी त्यांच्या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला होता. केवळ स्वतः काम न करता जिल्ह्यातील नागरिकांनाही वनराई बंधारे उभारणी आणि जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम घाग बंधू करतात. बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेता त्यांचे कार्य अधिक महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रसिद्धीपेक्षा कर्तृत्वाला प्राधान्य देत गेली १६ वर्षे सुरू असलेली त्यांची जलसंवर्धनाची तपश्चर्या निश्चितच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून विकास आणि महेश घाग यांच्या निःस्वार्थ समाजकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.













