आदिवासी मुलांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
खेळातून करिअर घडविण्याचा अंकिता पवार यांचा संदेश
चिपळूण (प्रतिनिधी) : आदिवासी मुले खेळांमध्ये अत्यंत निपुण आहेत. त्यांना योग्य संधी, आवश्यक सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यास ही मुले क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवू शकतात, असे प्रतिपादन चिपळूण येथील परांजपे मोतीवाले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तथा क्रीडा प्रशिक्षक श्रीमती अंकिता पवार यांनी केले. श्रमिक सहयोग संस्थेच्या वतीने कोळकेवाडी येथील प्रयोगभूमी शिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कला-क्रीडा उत्सवाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या की, मुलांनी सर्वप्रथम मोठी स्वप्ने पहायला शिकले पाहिजे. आपल्यातील क्षमता ओळखून भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे आहे, हे निश्चित केले पाहिजे. त्यानुसार नियोजनबद्ध दिनक्रम आखून सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शारीरिक तंदुरुस्ती यांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. श्रमिक सहयोग संस्थेच्या वतीने शनिवार व रविवार दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय कला-क्रीडा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध वाडी शिक्षण केंद्रांतील ५ ते १५ वयोगटातील तब्बल ९२ मुले-मुलींनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रा. प्रदीपकुमार देंडगे, कला शिक्षक परशुराम गावण तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांनी मुलांसाठी चित्रकलेचे विशेष सत्र घेतले. या सत्रातून मुलांना आपल्या कल्पनाशक्तीला रंगांच्या माध्यमातून अभिव्यक्त करण्याची संधी मिळाली. दुपारनंतर कबड्डी व खो-खो या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर राकेश प. मि. यांनी बौद्धिक खेळांचे सत्र घेतले. या सत्रातून मुलांच्या विचारशक्तीला आणि कल्पकतेला चालना मिळाली. रात्री बांडगी, गौंडी, कलरी, जाखडी अशा पारंपरिक लोककला व सांघिक नृत्यांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. या नृत्यांमध्ये मुले, शिक्षक आणि कार्यकर्तेही उत्साहाने सहभागी झाले.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी धावणे, लांबउडी तसेच कबड्डीचे अंतिम सामने पार पडले. या क्रीडा स्पर्धांसाठी अलोरे हायस्कूलचे जीवन पाटील आणि पोफळी हायस्कूलचे प्रदीपकुमार यादव यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर झालेल्या समारोप समारंभाचे प्रास्ताविक राजन इंदुलकर यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती अंकिता पवार उपस्थित होत्या. तसेच श्रमिक सहयोग संस्थेचे संस्थापक विश्वस्त भार्गव पवार, कार्यवाह सुषमा इंदुलकर, व्यवस्थापक गणेश खेतले आणि आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हा सचिव महेश जाधव आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
यावेळी उत्सवात सहभागी झालेल्या पाच विद्यार्थी प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. दोन दिवसांच्या उत्सवातील अनुभव, शिकायला मिळालेल्या नव्या गोष्टी आणि सहभागी होताना मिळालेला आनंद त्यांनी आपल्या शब्दांत मांडला. त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कला, क्रीडा, बौद्धिक खेळ आणि पारंपरिक लोककला अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा दोन दिवसीय उत्सव अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंगेश मोहिते, रेखा मोहिते, विठ्ठल निकम, पूजा जाधव, अजय निकम, अजित पवार आणि स्नेहा बोलाडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. तसेच प्रयोगभूमीतील विद्यार्थ्यांनीही आयोजनात मोलाचे योगदान दिले. आदिवासी मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना, क्रीडा कौशल्याला आणि आत्मविश्वासाला योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्यातील अनेक सुप्त प्रतिभा उजेडात येऊ शकतात, याची प्रचिती या कला-क्रीडा उत्सवातून आली.













