स्वतः काम करून पोलीस भरतीची तयारी; अकॅडमीच्या वतीने मैदानावर सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : येथील शिवशक्ती अकॅडमीचा विद्यार्थी राजाराम भिवा कांडरकर (रा. माणगाव) याने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाबद्दल शिवशक्ती अकॅडमीच्या वतीने मैदानावर त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
राजाराम यांचे आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती सांभाळत त्यांनी स्वतः काम करून पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली होती. यापूर्वी ते होमगार्ड म्हणूनही कार्यरत होते. कामासोबतच नियमित सराव आणि मेहनत सुरू ठेवत त्यांनी भरतीचे स्वप्न पूर्ण केले. जून महिन्यात त्यांच्या आईचे निधन झाले. अशा कठीण प्रसंगातूनही खचून न जाता त्यांनी आपले ध्येय गाठले, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शिवशक्ती अकॅडमीच्या वतीने मैदानावर सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल मोहिते, शिवशक्ती अकॅडमीचे प्रशिक्षक नितीन सावंत तसेच अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अकॅडमीचे संचालक नितीन सावंत यांनी आगामी काळातही शिवशक्ती अकॅडमीच्या माध्यमातून असेच यशस्वी निकाल देण्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात तलाठी आणि पोलीस भरती होणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी अकॅडमी सज्ज असून, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.













