आ. दीपक केसरकर व आ. निलेश राणे यांच्यासह जिल्हाप्रमुख संजू परब यांची उपस्थिती
सावंतवाडी : संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन अभियानाचा’ लोकार्पण सोहळा, संविधान उद्देशिकेची शपथ आणि स्वच्छता अभियान हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत, जिल्हा परिषद सभापती संतोष साटविलकर, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी (रिजनल ऑफिसर) नीलेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग, पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपणे, किल्ल्याचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा या अभियानामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी संविधान दिनानिमित्त सर्व उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शपथ घेतली आणि परिसर स्वच्छतेसह ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.













