दुधेरे येथे अज्ञात चोरट्यांचा डल्ला; शेतजमिनीवरील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर लंपास

मंडणगड (प्रतिनिधी): मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे अज्ञात चोरट्यांनी चोरीची घटना घडवून आणल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडे सात वाजेपर्यंतच्या मुदतीत ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, दुधेरे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथील मंदा पर्वत दळवी यांच्या मालकीच्या जमीन सर्वे क्रमांक ३२(१), ३२(२), ३२(५), ३३(६) व ३३(७) या क्षेत्रामध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. प्रकरणी बाळाराम अनंत जोशी (वय ४०, व्यवसाय मजुरी, रा. बारकोंबडावाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीस गेलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवली जात होती. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरच लंपास केल्याने या चोरीचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
मंडणगड पोलिसांकडून या चोरीचा पुढील तपास सुरू आहे.