एल.टी.टी. स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ; ७ डिसेंबरपर्यंत रंगणार क्रीडा स्पर्धांचा थरार

खेड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्यांना वाव देऊन त्यांना खेळाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल.टी.टी. इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड यांच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शिवतर रोड–भडगाव येथील प्रशालेच्या नवीन मैदानावर २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ जयेश गुहागरकर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून, माजिद खतीब यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यामुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशालेचे मुख्याध्यापक सारंग सर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी गोळाफेक या क्रीडा प्रकाराचा आनंद घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
उद्घाटन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी लीडर मार्चपास आणि एमसीसी मार्चपास सादर करत शिस्तबद्ध संचलनातून क्रीडा ध्वजाला मानवंदना दिली. प्रशालेच्या लेझीम पथकाने ‘शिवनेरीवर शिवबा जन्मला’ या गीताच्या तालावर बहारदार नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खेळामध्ये प्रामाणिकपणा, शिस्त आणि खिलाडूवृत्ती जपण्याचा संदेश देत सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली.
यावेळी समन्वयक सेबास्टियन जॉय सर यांनी आपल्या मनोगतात खेळाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळातही सक्रिय सहभाग घेऊन आपली क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन करत त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, डॉ. पुष्कर नेने आणि विलीन पाटणे यांनी क्रीडा महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समन्वयिका एल्सी मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर मॅडम, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तिन्ही स्तरांवर क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार असून, यामध्ये गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, १०० मीटर आणि २०० मीटर धावणे या वैयक्तिक स्पर्धांसह कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, टग ऑफ वॉर, क्रिकेट आणि रिले अशा सांघिक स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे रेड, ग्रीन, यलो आणि ब्ल्यू असे चार गट करण्यात आले असून, या गटांमध्ये विविध स्पर्धा रंगणार आहेत.
विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुणांना संधी, स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि सांघिक भावना विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक क्रीडा महोत्सवात आगामी दिवसांत मैदानावर विविध खेळांचा उत्साह आणि चुरस पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन आफरीन कौचाली मॅडम यांनी केले.