खेड (प्रतिनिधी) राकेश कोळी :
खेड नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. यंदाच्या नव्या प्रभागरचनेनुसार एकूण 10 प्रभाग तयार करण्यात आले असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक असे 20 नगरसेवक निवडले जाणार आहेत. तर नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने या पदासाठीची स्पर्धा अधिक महत्त्वाची ठरते. मात्र यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांची राजकीय समीकरणे कोलमडली आहेत.
गेल्या पंधरा वर्षांपासून शहरातील राजकारणात प्रभाव राखणारे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला असून त्यांच्या सोबत मोठा कार्यकर्ता वर्ग देखील भाजपात दाखल झाला आहे. त्यामुळे भाजपाचे संघटन आता शहरात अधिक स्थिर होत असून निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
जोपर्यंत अधिकृतपणे युतीबद्दल निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत नाही. परंतु सध्याचे संकेत असे की खेड शहरातील निवडणूक ही थेट शिवसेना विरुद्ध भाजप अशी होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
खेड शहराचे शिवसेना पक्षाशी जिव्हाळ्याचे नाते आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचे शहराशी विशेष आणि भावनिक नाते आहे. शहरातील नागरिकांनी अनेक वर्षे रामदास भाईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेला साथ दिली आहे.
याचबरोबर शहराचे विद्यमान आमदार योगेश कदम हे गेल्या दहा वर्षांपासून खेड शहरात विविध विकासकामांना गती देत आहेत. त्यांनी शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणत पायाभूत सुविधा, रस्ते, जलपुरवठा, सार्वजनिक सेवा यामध्ये कामे केली आहेत. त्यामुळे शिवसेनेचा आधारवर्ग आणि मतदारांमध्ये योगेश कदम यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास टिकून असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर आमदारांच्या पत्नी सौ. श्रेया कदम या शहरातील प्रभागांमध्ये जाऊन महिलांच्या समस्या, स्थानिक प्रश्न आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होत असल्याने शहरातील महिलावर्गात त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.
मात्र दुसरीकडे भाजपातील नवीन नेतृत्व आणि संघटनात्मक हालचालींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी भाजपाचे संघटन वाढवले असताना, वैभव खेडेकर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद आणखी दृढ झाली आहे. तसेच वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यादेखील खेळ शहरात सक्रियपणे समाजकार्य करत असतात. वैभव खेडेकर यांच्यासोबत नेहमीच खांद्याला खांदा लावून सर्व उत्सव कार्यक्रम यामध्ये सहभागी देखील होत असतात. त्यांची खेळ शहरात महिलांशी असणारी जवळीक याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत भाजपला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र महायुती म्हणून दोन्ही पक्षांनी एकत्र लढत दिली तर खेड नगरपरिषदवर महायुती चा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. परंतु दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर खेड शहरात निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. यामध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व, कार्यकर्त्यांचे जाळे, तसेच शहरातील मुस्लिम समाजाचा मतदान कल निर्णायक ठरणार आहे.
सध्या तरी खेळ शहरात इतर राजकीय पक्षांना अस्तित्व नसल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना देखील उर्वरित राजकीय पक्षांच्या बाबत कोणतीही हालचाल होताना पहावयास मिळत नाही. त्यामुळे यंदा होणारी निवडणूक ही थेट भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच रंगणार यात कोणतीच शंका नाही. मात्र सध्या शहरात शिवसेनेचे पारडे जड असल्याचे बोलले जात असले तरी भाजपात झालेले बदल हे चित्र कुठवर बदलतात, हे मतदारच ठरवणार आहेत.
त्यामुळे ३ डिसेंबरला खेड नगरपरिषदेचे नेतृत्व कोणाकडे जाणार – शिवसेनेच्या स्थिर नेतृत्वाकडे की भाजपाच्या नव्या बळाकडे – याचे उत्तर मतपेट्याच देणार आहेत.
गेल्या नगरपालिकेत भाजपने खेड शहरात नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र गेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला खेड शहरात अपेक्षित यश मिळाले नसल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र यंदा वैभव खेडेकर यांच्या रूपाने नवा चेहरा भाजपला खेड शहरासाठी मिळाला असून त्यांची जादू किती चालते याकडे शहरवासीयांसह तालुक्यचे लक्ष लागून राहिले आहे











