चिपळूण (रत्नागिरी): प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सात संशयित आरोपींनी लोखंडी कोयता, लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी जबर मारहाण करत पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी सानीया फैजान चौगले (वय २२, रा. खेर्डी मोहल्ला, संस्कृती हॉलमागे, ता. चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना मंगळवारी (दि. २५ नोव्हेंबर २०२६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भेंडीनाका तसेच गोवळकोट बायपासवरील एनरॉन ब्रीज परिसरात घडली. फिर्यादी सानीया यांनी साक्षीदार फैजान याच्याशी प्रेमविवाह केल्याचा राग संशयित आरोपींच्या मनात होता. भेंडीनाका येथून जात असताना फिर्यादी व साक्षीदार फैजान यांची मोटारसायकल बंद पडली. त्यावेळी संशयित आरोपी अब्दुल बाबासाहेब शेख हा फिर्यादीकडे पाहून हसल्याने साक्षीदार फैजान याने विचारणा केली; यावरून वाद होऊन शर्ट पकडून ढकलाढकल व शिवीगाळ करण्यात आली.
यानंतर फिर्यादीने आपल्या सासूला फोन करून कुटुंबातील सदस्यांना भेंडीनाका येथे बोलावले. दरम्यान, गोवळकोट बायपासवरील एनरॉन ब्रीजजवळ संशयित आरोपी कुटुंबातील सदस्यांना लोखंडी कोयता, लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. फिर्यादी व साक्षीदार तेथे गेले असता, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सर्वांवर जबर मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ व धमकी देण्यात आली.
या हल्ल्यात रेहान साबळे, फैजान चौगले, सऊद चौगले, सलमा चौगुले आणि फिर्यादी सानीया फैजान चौगले (सर्व रा. खेर्डी मोहल्ला, संस्कृती हॉलमागे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७२/२०२६ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.












