किल्ले सिंधुदुर्गवर संविधानाचा जागर!

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहीम

संविधानाच्या मूल्यांसह गडकिल्ले संवर्धनाचा सामूहिक संकल्प

मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या शौर्यगाथेचा साक्षीदार असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी भारतीय संविधानाचा गौरव आणि पर्यावरण संरक्षणाचा जागर घडला. संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग किल्ला परिसरात आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक वारशाचे जतन, पर्यावरण संरक्षण आणि संविधानातील मूल्यांचे संवर्धन असा या उपक्रमाचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांच्या परिसरात एकाचवेळी हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि पर्यटन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतींचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवून ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

*संविधान हे देशाच्या एकात्मतेचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान – आमदार दीपक केसरकर*

यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत संविधानातील मूल्यांची मुळे असल्याचे प्रतिपादन केले. सर्वांना समान न्याय, शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत शिवाजी महाराजांनी त्या काळातच दूरदृष्टीने विचार मांडला होता. आज आपण हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धनाबाबत चर्चा करतो; मात्र निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्व शिवकालीन विचारांतही दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक मूल्यांमुळे विविध धर्म आणि जातींचे नागरिक एकत्रितपणे देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी देणारे संविधान हे देशाच्या एकात्मतेचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

*देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यात संविधानाची भूमिका महत्त्वपूर्ण – आमदार निलेश राणे*

आमदार निलेश राणे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अधिवेशनानंतर पुरातत्त्व विभागासोबत बैठक घेऊन आवश्यक निधी आणि परवानग्यांबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाला मिळालेल्या संविधानामुळे प्रत्येक समाजघटकाला समानता, न्याय आणि अधिकार प्राप्त झाले आहेत. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यात संविधानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाची घोषणा करून संविधानाच्या सन्मानाची परंपरा अधिक व्यापक केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हा उपक्रम पुढे आला. किल्ले रायगड सह 11 किल्यांवर एकाचवेळी कार्यक्रम सुरु असल्याचे आमदार निलेश राणे यांनी नमूद केले.

देशाला एकत्र ठेवण्याचे काम संविधान करतं आहे. शेवटच्या घटका पर्यत न्याय संविधान देते. आज अनेक देश जळत आहेत, हिंसाचार होतं आहेत. कारण संविधान पालन होतं नाही. आपल्या देगात संविधान पालन होते. सर्वाना समानतेने पाहिले जाते. संविधानाचे महत्त्व व्यापक असल्याचेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले. आमदार निलेश राणे यांनी विस्तृतपणे विचार मांडले.उपस्थितांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे यांसह प्रांतधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार गणेश लव्हे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रतीक थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळ प्रादेशिक अधिकारी निलेश पाटील, तुषार गवळी – विशेष अधिकारी समाज कल्याण विभाग, प्रताप कांबळे – समाज कल्याण निरीक्षक

गृहपाल कुणाल इंदलकर, शिवसेना सोशल मीडिया विधानसभा प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना शहर प्रमुख रोहन आचरेकर, मोहन वराडकर, दया प्रभूदेसाई, चेतन साळकर यांसह समाज कल्याण विभाग अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नागरिक व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता दूत संग्राम कासले, निलेश पवार यांनी केले.

फोटो : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांनी केले. (अमित खोत, मालवण)

फोटो : संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

फोटो : किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहिमेत आमदार निलेश राणे तसेच आमदार दीपक केसरकर व पदाधिकारी सहभागी झाले. (अमित खोत, मालवण)