मडूरा रेडकरवाडीत वेडसर माकडाची दहशत

 

दुचाकींची तोडफोड : ग्रामस्थ भयभीत

बांदा : प्रतिनिधी

 

मडूरा – रेडकरवाडी आणि देऊळवाडी परिसरात एका पिसाळलेल्या माकडाने मोठा उच्छाद मांडला आहे. या माकडाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या माकडाने परिसरातील अनेक दुचाकींचे नुकसान केले असून नागरिकांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न होत असल्याने घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून या माकडाचा वावर रेडकरवाडी आणि देऊळवाडी भागात आहे. स्थानिक रहिवासी समीर परब यांच्या घराच्या अंगणात पार्क केलेल्या तीनही दुचाकींचे आरसे या माकडाने फोडून मोठे आर्थिक नुकसान केले. याशिवाय वाडीतील इतरही अनेक दुचाकींची या माकडाने तोडफोड केली आहे.

 

स्थानिकांनी या माकडाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यास तो उलट ग्रामस्थांच्या अंगावर धावून येत आहे. माकडाच्या या आक्रमक पवित्रा आणि हल्ल्याच्या भीतीमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिसरातून फिरणेही कठीण झाले आहे.

या प्रकारामुळे ग्रामस्थ धास्तावले असून एखादी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी वनविभागाने या माकडाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.