मिथुन मणचेकर, धिरज घाडी, पारस वरेरकर व पार्थ पारधी यांच्या गटास प्रथम क्रमांक
शिरगांव (प्रतिनिधी) : साळशी ग्रामविकास मंडळ, साळशी संचलित माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे विद्यार्थी केंद्रित उपक्रमांतर्गत गुरुवारी रानभाजी व पालेभाजी विद्यार्थी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक, पारंपरिक व आरोग्यदायी रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या व पालेभाज्यांपासून स्वादिष्ट व आरोग्यदायी पदार्थ तयार करून सादर केले. चव, स्वच्छता व सादरीकरण या निकषांवर परीक्षकांनी परीक्षण केले.
स्पर्धेत मिथुन मणचेकर, धिरज घाडी, पारस वरेरकर व पार्थ पारधी यांच्या गटास प्रथम क्रमांक मिळाला. संचित घाडी, सोहम घाडी व यश मोंडकर यांच्या गटास द्वितीय, तर आर्या राणे, चंदना राणे व नताशा मोंडकर यांच्या गटास तृतीय क्रमांक मिळाला.
उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक समर्थ साटम व भूषण देवणे यांच्या गटास, तर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक सानवी राणे, नम्रता राणे व वेदिका राणे यांच्या गटास मिळाले.
या स्पर्धेत एकूण ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण रानभाज्या, त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती आणि पारंपरिक पद्धतीने केलेले सादरीकरण यामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत साळशी केंद्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका श्रीमती स्मिता कोदले (जि. प. केंद्र शाळा साळशी क्र. १) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण श्रीमती स्मिता कोदले व माजी विद्यार्थीसंघाच्या अध्यक्षा श्रीमती श्रेया धुळप यांनी केले. त्यांनी पदार्थांची चव, स्वच्छता व सादरीकरणाच्या आधारे परीक्षण करून निकाल जाहीर केला.
या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री. सुनील कोदले व मुख्याध्यापक श्री. संजय मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व सांगून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
स्पर्धेचे नियोजन श्री. पुरुषोत्तम साटम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिपिक श्री. स्वप्निल भरणकर, शिपाई श्री. सदाशिव भिसे व ग्रामस्थ श्री. दिनेश सावंत यांनी विशेष मेहनत घेतली.
स्पर्धेच्या शेवटी विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.












