गौरव पोंक्षे माखजन :
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पालशेत येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यानिमित्ताने विद्यालयात संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली.
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची संविधान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच विद्यालयाच्या परिसरात संविधान दिनानिमित्त आकर्षक रांगोळी साकारण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषणांच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांविषयी विचार मांडले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री. सोनवणे सर यांनी अतिशय उत्कृष्ट व नियोजनबद्ध पद्धतीने केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमातील सर्व उपक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अतुल अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संविधानातील मूल्यांची जपणूक आणि लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.













