सावंतवाडी । प्रतिनिधी : अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आजरा येथील दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आंबोली मार्गावरील बावळाट तिठा येथे करण्यात आली. इसाक अब्दुल नेसरीकर आणि तौसिफ नेसरीकर (दोघे रा. आजरा जि. कोल्हापुर) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, वाहतूक करण्यात येणारी तब्बल १८ गुरे जप्त करण्यास यश आले असून त्यांना फोंडा-गोवा येथील गो शाळेत हलविण्यात आले आहे. याबाबतची तक्रार वाहतूक पोलिस प्रशांत धुमाळे यांनी दिली आहे. त्यानुसार गुरे वाहतूक केल्या प्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांना नोटीसा देवून सोडून देण्यात आले, असे ठाणे अमंलदार आबा पिरणकर यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ येथून आंबोलीच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती काही तरुणांकडुन पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार त्या दोघांना बावळाट तिठ्यावर सापळा रचून पकडण्यात आले.
यावेळी संबंधिताच्या गाडीची तपासणी केली असता त्यात तब्बल १८ गुरे आढळून आली. याप्रकरणी त्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ट्रकसह त्यांच्या ताब्यात असलेली गुरे जप्त करण्यात आली. त्याच बरोबर ती गुरे गोवा येथील एका गो शाळेत पाठविण्यात आली, अशी माहिती आंबोली दुरक्षेत्राचे हवालदार जगदिश दुधवडकर यांनी दिली. ही कारवाई वाहतूक पोलीस प्रशांत धुमाळे यांच्यासह प्रवीण सापळे व अमोल धुरी यांनी केली.











