इस्रोतील श्री.अक्षत मोहिते या तरूण शास्त्रज्ञाची लोकसाधनेला सदिच्छा भेट , मुलांशी साधला संवाद

दापोली l प्रतिनिधी : इस्त्रो येथील तरुण शास्त्रज्ञ अक्षत मोहिते यांनी लोकसाधना चिखलगाव येथे सदिच्छा भेट दिली व मुलांची मनमोकळा संवाद साधला. अक्षत मोहिते हे एस्ट्रोबोन स्पेस अँड डिफेन्स टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ तसेच NASA येथील सगळ्यात तरुण अंतराळवीर असून ,आज इस्रोच्या चंद्रयान दोन, चंद्रयान तीन या प्रकल्पामध्ये त्यांनी इस्त्रो येथे मोलाचे योगदान दिले आहे. जगातले सगळ्यात तरुण अंतराळवीर म्हणून आज त्यांची ख्याती आहे, तसेच तीसहून जास्त रिसर्च पेपर्स तसेच चार हून अधिक पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. अशा २२ वर्षाच्या तरुण शास्त्रज्ञांनी आज लोकमान्य टिळक विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज चिखलगाव येथे पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. महाड हे मूळ गाव असलेल्या अक्षत सरांनी त्यांचा सगळा प्रवास मुलांना सांगितला, तसेच अंतराळवीर प्रशिक्षणादरम्यानचे रोमहर्षक किस्से ही सांगितले. सहज सोप्या भाषेमध्ये आज तुम्ही अवकाशासंबंधी अनेक प्रकारचे काम करू शकता व त्या संधी कशा मिळू शकतात याचीही विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच त्यांचे अनेक फोटो, नासा येथील ट्रेनिंग दरम्यानचे अनुभव ,आज आपल्याला माहित असलेल्या राकेश शर्मा, इस्रोचे प्रमुख,इलोन मस्क यांच्याबरोबरचे काही संवादाचे किस्से ही त्यांनी मुलांना सांगितले. आजचा दिवस जणू कल्पनेतलाच दिवस वाटल. स्पेस सायंटिस्ट हे आपल्यासारखेच असतात, हे पाहून मुलांनाही खूप गंमत वाटली. मुलांनीही त्यांना अनेक गमतीदार प्रश्न विचारले तसेच त्यांच्या प्रवासातले किस्से अडचणी यावरही मुलांनी चर्चा केली. इतकी मोठी व्यक्ती एका छोट्याशा शाळेत येऊन मुक्त संवाद साधताना बघून आज आम्ही सर्व भारावून गेलो. तसेच इथून पुढे अवकाश संशोधनाची भारताची दिशा काय असेल यावरही त्यांनी प्रकाश टाकला, असे अनेक अवघड विषय त्यांनी सोपे करून मुलांसमोर मांडले. या कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षक श्री ढेरे सर यांनी उत्तम पद्धतीने पार पाडले. तसेच मुख्याध्यापक श्री.गरंडे सर यांनी पाहुण्यांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम संपल्यावर मुलांनी या प्रत्यक्ष अवतरलेल्या अंतराळवीराशी मनमोकळा संवाद साधला.