मराठा समाज लांजा तालुका च्या वतीने जालना येथील घटनेचा करण्यात आला जाहीर निषेध

घटनेतील दोशींवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आंदोलन करणार, देण्यात आला इशारा

लांजा (प्रतिनिधी) मराठा समाज लांजा तालुक्याच्या वतीने जालना येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला असून या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे .याबाबतची निवेदन आज रविवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.

तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की ,मराठा समाजाला शिक्षण, नोकरी यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे मराठा समाजाने विविध मार्गाने ५८ मोर्चे आणि आंदोलने शांततेत काढून जगभरात नाव केले आहे. यासाठी मराठा समाजातील ४२ तरुणांनी आत्म बलिदान देखील केले आहे. मराठा समाजाने कष्टाने मिळवले आरक्षण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवू शकले नाही आणि म्हणूनच मराठा समाजात याबाबत संतप्त भावना आहेत. याचाच एक भाग म्हणून जालना या ठिकाणी आपल्या न्याय हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे पाटील या मराठा मावळ्याने २९ ऑगस्ट पासून चालू केलेले बेमुदत आमरण उपोषण उधळून लावण्यासाठी पोलिसांच्या प्रचंड फौजफाटा घेऊन हे आंदोलन चिरडून काढण्याचे प्रयत्न केले गेले.

मराठा समाजातील महिला ,लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, युवक, युवती यांच्यावर लाठीहल्ला आणि गोळीबार करून जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या मराठा समाजावर हल्ला केलेला आहे .ही बाब अत्यंत खेदजनक असून मराठा समाजाला हीन वागणूक देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना शासनाच्या आदेशानुसार अमानुष लाठीचार्ज केला आहे. या लाठी चार्जमुळे शांततेत होत असलेल्या आंदोलनाला कुठेतरी चिघळवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. याचा लांजा तालुका मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत आहेत.

मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जमुळे अनेक मराठा बांधव जखमी झाले आहेत. याबाबत मराठा समाजास संतप्त भावना निर्माण झाली आहे. त्याच्या राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आणि म्हणूनच सदर घटनेतील दोशींवर तातडीने कारवाई न झाल्यास मराठा समाजाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .सदर निवेदन सादर करताना लांजा तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष सुभाष राणे, सचिव विजय पाटोळे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.