जालन्यातील लाठीहल्ला घटनेचा राजापूर मराठा समाज सेवा संघाच्या वतीने जाहिर निषेध

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे दिले निवेदन

राजापूर l प्रतिनिधी : जालना येथील अंतरवली सराटी येथे मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्लयाचा सोमवारी राजापूर तालुका मराठा समाज सेवा संघाच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अग्रेसीत करत मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन राजापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली ४० वर्ष हा समाज संघर्ष करीत आहे. आपल्या या मागणीसाठी अभूतपूर्व असे शांततेत ५८ मोर्चे काढले ज्याची नोंद जगभरात घेतली गेली तरीही मराठा समाजाला ५०% च्या आतील संविधानिक आरक्षण मिळाले नाही. एसइबिसी, ईएसबिसी अशी तात्पुरती आरक्षण सरकारने जाहीर करून दिले पण ते कोर्टाच्या कचाट्यात अडकविण्यात आले. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या मिळून देखील नियुक्त्या मिळाल्या नाहीत. या मुळे मराठा तरुणांमध्ये नैराश्य पसरून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. यासाठी समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी शांततेत आंदोलने चालू आहेत. तसेच आंदोलन जालना जिल्ह्यातील अंतरवळी सराटी येथे चालू असताना पोलिसांमार्फत अचानक बेछूट लाटीचार्ज आंदोलकांवर करण्यात आला त्यामध्ये समाजातील अनेक वयोवृध्द नागरिक, महिला, मुले व तरुण अत्यंत गंभीर जखमी झाले. याचा आम्ही राजापूर तालुक्यातील मराठा समाजातील लोक तीव्र निषेध करीत असून यातील दोषींवर कारवाईकरावीअशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच मराठा समाजाला ५०% च्या आतील न्यायालयात टिकणारे ओबीसी आरक्षण मिळावे, एसइबिसी, ईएसबिसी ह्या प्रक्रिये अंतर्गत निवड झालेल्या तरुणांना ताबोडतोब सरकारी सेवेत सामावून घ्यावे. आण्णासाहेब आर्थिक विकास माहामंडळा मार्फत दिल्या जाणाऱ्या १५ लाख रू. कर्जाची प्रक्रिया सुटसुटीत करून संबंधित कर्जाच्या ७५% कर्जाची हमी केंद्र शासन व नाबार्ड यांनी उद्योगांना देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्ट प्रमाणे सदर कर्जाची हमी शासनाने घ्यावी व वीणा तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. सारथी या संस्थेची केंद्रे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने चालू करावीत अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. सकल मराठा परिवाराच्या वतीनेही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

राजापूर तहसीलदार सौ. शीतल जाधव व राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांना ही निवेदने देण्यात आली. यावेळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या भावना आंम्ही शासनापर्यंत पोहचवू अशी ग्वाही मराठा बांधवांना दिली.

याप्रसंगी मराठा समाज सेवा संघाचे प्रकाश पवार, प्रकाश आमकर, अ‍ॅड. राहुल राणे, अ‍ॅड. गुरूदत्त खानविललकर, अ‍ॅड. सुशांत पवार, अ‍ॅड. कपिल राणे, संजय ओगले, नरेंद्र मोहिते, विनायक सावंत, प्रफुल्ल सावंत, संदीप देसाई, उमेश दळवी, प्रकाश ढवळे, प्रमोद सुर्वे, संतोष सरफरे, अमोल धुळप, श्रीराम विचारे, महेश विचारे, कुलदीप लांजेकर, प्रशांत करंबेळकर, राजेश नलावडे, संतोष राणे, उदय राणे, चंद्रकांत शिंदे, विनोद पवार, संजय राणे, रवींद्र सुर्वे, सतीश राणे, सतीश सुर्वे आदी उपस्थित होते.