सिद्धहस्त मुर्तीकार विलास मांजरेकर यांची भव्य कलाकृती
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरीत ठरणार आकर्षण
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील सुप्रसिद्ध व सिद्धहस्त मुर्तीकार विलास मांजरेकर व ओंकार मांजरेकर यांनी महाबली पवनपुत्र हनुमंताची भव्य मुर्ती साकारली आहे. आचरा मालवण येथील मंदार सरजोशी नामक एका हनुमान भक्ताच्या मागणीनुसार ही तब्बल १७ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही मुर्ती मालवण नगरीत उभारली जाणार असून पर्यटन नगरीत येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मुर्ती एक वेगळे व खास आकर्षण ठरणार आहे.
विलास मांजरेकर यांच्या चित्रशाळेत शनिवार ३१ डिसेंबर रोजी या मुर्तीच काम पुर्ण झालं. आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२३ रोजी ही मुर्ती मालवणनगरीत दाखल होणार असून नववर्षाच्या स्वागताला ही भव्य मुर्ती मालवण येथे बसविण्यात येणार आहे.
याबाबत विलास मांजरेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, गेले सहा महिने आम्ही ही मुर्ती घडवण्यासाठी अपार मेहनत घेतली. दोन वर्षांपूर्वी ही मुर्ती साकारण्याचा मानस मालवण येथील एका हनुमान भक्ताने व्यक्त केला होता. आतापर्यंत मारुतीची भव्य मुर्ती साकारण्याचा योग आला नव्हता. तो मुर्ती च्या निमित्ताने घडून आला. देवाची मुर्ती म्हणून आम्ही साकारलीय. एक कलाकार म्हणून हा आनंद शब्दांत सांगण कठीण आहे. देवाच्या कृपेमुळेच आम्हाला सर्व काही मिळालं आहे, अशी भावना मुर्तीकार विलास मांजरेकर यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी माजगाव येथील सिद्धहस्त मुर्तीकार विलास मांजरेकर गेली अनेक वर्षे मुर्ती कलेत कार्यरत आहेत. त्यांच्या असंख्य कलाकृती राज्याच्या कानाकोपऱ्यात पहायला मिळतात. त्याच बरोबर गोवा, कर्नाटक आदी भागातही त्यांनी साकारलेल्या मुर्त्या दिसून येतात. त्यांच्यासह मांजरेकर कुटुंब गेली अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साकारलेली हनुमंताची १७ फुटी मुर्ती लक्षवेधी ठरत असून ही मुर्ती पहाण्यासाठी व मोबाईलमध्ये मुर्तीची छबी टिपण्यासाठी अनेकांचे पाय उद्यमनगराकडे वळू लागले होते.
फोटो – माजगाव येथील सिद्धहस्त मूर्तिकार विलास मांजरेकर यांच्या उद्यमनगर येथील चित्र शाळेत साकारलेली मारुतीरायाची भव्य १७ फूट मूर्ती
छाया – जतिन भिसे
Sindhudurg