मराठा आरक्षणासंदर्भात तहसीलदारांना मराठा समाजाचे निवेदन

*मराठा आरक्षण द्या आणि त्या पोलीस अधीक्षकाला निलंबित करा*
*कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
*जालना येथे मराठा बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा केला निषेध

फोटो;;

कणकवली ;
मराठा आरक्षणासाठी जालना येथे सुरू असलेल्या उपोषणामध्ये उपोषणकर्त्यांवर १ सप्टेंबर रोजी पोलिसांकडून झालेल्या लाठीमार घटनेचा सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने बुधवारी निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान संबंधित पोलीस अधीक्षकांना रजेवर न पाठवता निलंबित करा, या प्रकरणामध्ये अन्य सूत्रदारांचीही चौकशी करण्यात यावी. तसेच अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना देण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वराज्य सेना सिंधुदुर्ग, क्षत्रिय मराठा, मराठा उद्योजक संघ, मराठा महासंघ, मराठा ऑर्गनायझेशन, छावा संघटना, जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या वतीने जालना येथील घटनेच्या निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आम्ही केलेल्या मागण्यांचे गंभीर दाखल घेऊन त्याची लवकर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने भाई परब यांनी केली.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हयातील अंतरवाली सराठे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शांततेच्या मार्गाने संविधानिक पध्दतीने आमरण उपोषण सुरू होते. राज्य सरकारने ठोस आश्वासन न दिल्याने या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी अंबड व गेवराई तालुक्यातील १२३ गावांतील स्त्री, पुरूष शेतकरी १ सप्टेंबर रोजी उपोषण स्थळी जमले होते. यावेळी पोलीस फौजफाटा जमा केला गेला. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेण्यास नकार दिल्याने पोलिसांकडून निष्पाप आंदोलनकर्त्यांवर अमानुषपणे लाठीमार केला गेला. यामध्ये पुरूष वर्गाबरोबर मोठया प्रमाणात महिला वर्ग आणि मुले यांनाही पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. आयाबहिणींवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा आम्ही सकल मराठा समाजातर्फे जाहिर निषेध करतो.

आतापर्यंत जगाच्या इतिहासात शांततेने लाखोंच्या संख्येने मराठा समाजाकडून ५८ मोर्चे काढले गेलेत. तरीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत शासन ठोस पावले उचलत नसल्याने उपोषणासारख्या उपायांचा मार्ग अवलंबवावा लागला आहे. या शासनाला मराठा समाजाबद्दल आस्था असल्यास मराठा समाजाच्या मागण्या त्वरित पूर्ण करा, असे निवेदनात म्हटले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील तरूणांच्या भवितव्याचा विचार करता तात्काळ संविधानिक आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे. सकल मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असताना शासनाने मराठवाडयात कुणबी मराठा समाजाची वंशावळी तपासणी कामाचे आदेश दिले आहेत, याचा अर्थ शासन मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर राज्य शासनाने संपूर्ण मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची आपली निश्चित भूमिका काय? ती त्वरीत स्पष्ट करावी. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण करून समाजाचा वापर करण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल ,तर तो मराठा समाज कदापि सहन करणार नाही. अशा मागण्या निवेदनातून करण्यात आले आहेत.
यावेळी महेश सावंत, किशोर राणे, महेंद्र सांबरेकर, अनिल सावंत, सोनू सावंत, बबलू सावंत,भालचंद्र साटम ,दत्ताराम परब, संतोष सावंत, सौरभ धुरी, जयकुमार प्रभूगावकर, चंद्रसेन राणे, प्रदीप घाडी, योगेश परब, संतोष पुजारे, सदानंद चव्हाण, संतोष कदम, अभिजीत पवार, औदुंबर राणे, सुनील दळवी, मारुती राणे, सुभाष सावंत, अवधूत साटम, सिद्धेश सावंत आदी मराठा बांधव उपस्थित होते.