चिपळुणात काही ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी
चिपळूण ( वार्ताहर) : विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी जोरदार हजेरी लावली . सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण अनंत आईस फॅक्टरी आणि भैरीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता जलमय झाला होता. यातूनच विद्यार्थ्यांना मार्ग काढत घरी परतावे लागले.
काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गोकुळाष्टमी पासून पाऊस सुरू झाला. परंतु शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आणि सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. या पावसाने शिवनदीच्या पाण्याची पातळी सुध्दा वाढत गेली. चिंचनाका ते सांस्कृतिक केंद्रकडे जाणाऱ्या मधला भाग आहे तो जलमय झाला होता. भैरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही २ फुटांपेक्षा पाणी होते. चिपळूण बाजारा समोर गटारे पाण्याने भरल्याने रस्त्यावरती पाणी जमा झाले होते. याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. गटारांची रुंदी व खोली वाढविणे गरजेचे आहे. मात्र दोन ते तीन तास पाऊस पडला तरी सुद्धा आईस फॅक्टरी येथे पाणी भरते.
अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची भांबेरी उडाली.












