वैभववाडी – गगनबावडा मार्गावरील खड्डे भरण्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

Google search engine
Google search engine

डांबर न टाकताच पसरली जात होती खडी ; करूळ हद्दीत निकृष्ट काम खपवून घेणार नाही : सरपंच नरेंद्र कोलते यांचा अधिकारी, ठेकेदारांना इशारा

वैभववाडी | प्रतिनिधी
वैभववाडी – गगनबावडा मार्गावर जामदारवाडी नजीक सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम सरपंच नरेंद्र कोलते व ग्रामस्थांनी बंद करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे. करूळ हद्दीत निकृष्ट काम खपवून घेणार नाही असा इशारा सरपंच श्री. कोलते यांनी अधिकारी व ठेकेदारांना दिला आहे.
वैभववाडी ते गगनबावडा मार्ग खड्डेमय झाला आहे. करूळ जामदारवाडी, करूळ शाळा व घाट पायथा या परिसरात मार्गाने मुलांना चालणेही अवघड झाले आहे. रविवारपासून जामदारवाडी येथे रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले. डांबर न टाकताच खडी पसरली जात होती. ग्रामस्थांच्या हे निदर्शनाला येताच करूळ सरपंच नरेंद्र कोलते व ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी जात काम बंद पाडले.
पावसात टाकलेली मुरूम माती न काढताच त्यावर खडी पसरली जात होती. तसेच खड्ड्यात डांबर न टाकताच खडी पसरवली जात होती. ग्रामस्थांच्या हे निदर्शनाला येताच ग्रामस्थांनी काम बंद पाडले. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेताच संबंधित कर्मचारी व ठेकेदाराने खडी काढून डांबर टाकतो अशी नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. पसरवलेली संपूर्ण खडी बाजूला करत डांबर मारूनच पुन्हा खडी पसरवण्यात आली. निकृष्ट काम खपवून घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी माजी पं. स.सदस्य बाळा कदम, माजी सरपंच रमेश पांचाळ, ग्रा. पं. सदस्य भास्कर सावंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.