नळपाणी योजनेच्या कामाकरिता कुडुकखुर्द बौध्दवाडी येथील ग्रामस्थांचे जुन्या योजनेचे पाणी सहा दिवस बंद

ग्रामस्थांची गैरसोय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे तहसिलदारांना निवेदन

मंडणगड | प्रतिनिधी : कुडुकखुर्द बौध्दवाडी येथील वयोवृध्द नागरीक, महिला व सर्वच नागरिकांना पाण्यापासून वंचीत ठेवून वाडीतील नागरीकांची जाणीवपुर्वक गैरसोय करणाऱ्या सर्व संबंधीतांचे विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्यावतीने 2 जानेवारी 2023 रोजी तहिसलदार मंडणगड यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकरिता मंडणगड तहसिलदार विजय सुर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहीतीनुसार गेल्या सहा दिवसांपासून कुडुकखुर्द बौध्दवाडी येथे पाण्याची गैरसोय जाणीव पूर्वक निर्माण करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कुडूकखुर्द यांचे कार्यक्षेत्रातील बौध्दवाडीतील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वीत होती पंरतू शासनाच्या जलजीवन मिशनचे माध्यमातून या योजनेच्या दुरुस्तीच्या नावाखाली पुर्वी असलेली पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीने कुणतीही पुर्व कल्पना न देता व पाण्याची पर्यायी व्यवस्था न करताच पुर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय झाली आहे व नागरीकांना गेल्या सहा दिवसांपासून नाहक त्रास दिला आहे.

या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडे वाडीतील ग्रामस्थांनी चौकशी केली असता त्यांनी मंजुर कामाचे कार्यारंभ आदेशाची प्रत दाखविण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांचे बाबत शंका निर्माण होत असून जाणीव पुर्वक मागासवर्गीय वस्तीतील नागरिकांना पाण्यापासून वंचीत ठेवले जात आहे. तरी तहसिलदार मंडणगड यांनी या संदर्भात त्यांच्या स्तरावरुन ग्रामपंचायतीचे विरोधात चौकशी करुन वाडीतील नागरीकांच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था त्वरीत कारावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामस्थांची मागणी मान्य झाल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश साळवी, माझी तालुका अध्यक्ष राजेश गमरे, युवा कार्यकर्ता राजेश खैरे, महेश मर्चंडे, सुनील मोरे, सौरभ खैरे यांच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्यासह सर्व संबंधीतांना पोहच करण्यात आली आहे.