विजघर चेकपोस्टवर ७८ हजारांची दारु जप्त
चंदगडचे दोघे ताब्यात
दोडामार्ग पोलीसांची कारवाई
दोडामार्ग (प्रतिनिधी) :
गोव्यातून कोल्हापूरकडे होणार्या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात दोडामार्ग पोलीसांनी विजघर येथे कारवाई केली. या कारवाईत ७८ हजार ९६० रुपयांची दारु व वाहतुकीसाठी वापरलेली १ लाख रुपयांची कार असा एकूण १ लाख ७८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी मनोज विठोबा तुपारे (४२, रा. पाटणे, ता. चंदगड) व विजय वामन कळंगुटकर (४३, रा. हिरे, ता. चंदगड) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास विजघर चेकपोस्टवर करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने येणारी कार (एमएच ४२ एच २१५३) तपासणीसाठी विजघर चेकपोस्टवर थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे त्याची एकूण किंमत ७८ हजार ९६० रुपये आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघा संशयिताना ताब्यात घेण्यात आले. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली.
गोव्यातून दोडामार्गमार्गे कोल्हापूर अशी मोठ्या प्रमाणात दारु वाहतूक होत असते. मात्र, पोलीसांकडून कारवाई होताना फारशी दिसत नाही. पोलीसांनी कारवायांमध्ये सातत्य ठेवल्यास बेकायदा दारु वाहतुकीला आळा बसेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.











