मनसेचे असंख्य पदाधिकारी ,कार्यकर्ते पक्षांतराच्या तयारीत

जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांचा कार्यकर्त्यांची संपर्क नसल्याने तीव्र नाराजीचे वातावरण 

लांजा (प्रतिनिधी) जिल्हाध्यक्षांनी सर्व सामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडे फिरवलेली पाठ आणि त्यामुळे आपले प्रश्न मांडायचे कोणाकडे? या संभ्रमात असलेले लांजा तालुक्यातील मनसेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. साटवली,देवधे जि प गटासह लांजा शहरातील पदाधिकारी यांचा यामध्ये समावेश आहे.

लांजा शहर आणि तालुक्यात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून काम करत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्हाध्यक्ष या नात्याने काम करणारे अविनाश सौंदळकर यांनी लांजा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. आणि त्यामुळे येथील असंख्य मनसे पदाधिकारी कार्यकर्ते हे अविनाश सौंदळकर यांच्यावर नाराज आहेत. एखादी समस्या असेल किंवा एखादा प्रश्न प्रशासकीय स्तरावर मांडावयाचा असेल तर पक्षाचे शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष विभाग अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी आपले प्रश्न सांगायचे कोणाला? कोणाकडे प्रश्न मांडायचे ?असे प्रश्न या मनसे कार्यकर्त्यांसमोर पडलेले आहेत .

मात्र जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना अविनाश सौंदळकर यांना कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेण्यास वेळ नसल्याने या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे.गेल्या काही महिन्यांपासून हे चित्र असेच असल्याने जिल्हाध्यक्षांंबद्दल कार्यकर्ते मनसे पदाधिकारी यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. आणि म्हणूनच या नाराजी नाट्यातूनच तालुक्यातील अनेक मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे