मंडणगड तालुक्याच्या विकासाला राजकीय व प्रशासकीय यांच्यामुळे खीळ

रिपाई नेते राजेश गमरे यांच्या बेमुदत उपोषणाने जनतेचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न चव्हाट्यावर

मंडणगड l प्रतिनिधी :        रत्नागिरी जिल्ह्याचे सर्वात शेवटचे टोक म्हणून ओळखला जाणारा तसेच मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या मंडणगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला राजकीय व प्रशासकीय यांच्यामुळे खीळ बसली असून तालुक्यातील जनतेला याचा सर्वाधिक फटका बसत आहे.तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे महत्वाचे प्रश्न, समस्या घेवून रिपाई नेते , बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे यांनी मंडणगड तहसिल कार्यालासमोर गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केले असून गमरे यांच्या बेमुदत उपोषणामुळे तालुक्यातील जनतेचे प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत.

मंडणगड तालुका हा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यानंतर आजही अनेक समस्यांनी मंडणगड तालुक्यातील जनता जर्जर झाली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मंडणगड तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागात कर्तव्यावर असलेले अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आपापल्या नेमणुकीच्या ठिकाणी, मुख्यालयी राहत नाहीत.उलट सरपंचांना हाताशी धरून आपण कर्तव्याच्या ठिकाणी राहतो असे बोगस दाखले शासन दरबारी हजर करून पळवाट काढत आहेत. हा मुद्दा अत्यंत गंभीर असून प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे अशी अत्यंत महत्वाची मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे यांनी आपल्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

तर रायगड-रत्नागिरी जिल्ह्याला जोडलेल्या सावित्री नदीवरील आंबेत-म्हाप्रळ खाडीपूल गेल्या चार वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली वाहतुकीस प्रशासनाने बंद केलेला आहे. केवळ तात्पुरती डागडुजी करून या खाडीपुलाचे दोनच पिलर दुरुस्ती करून हा पूल दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आला आहे. परिणामी मंडणगड, दापोली तालुक्यातील हजारो चाकरमानी तसेच पर्यटक यांच्यावर याचा परिणाम होवून मंडणगड तालुक्यातील जनतेची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.पर्यायाने तालुक्यातील व्यापारी पेठा अक्षरशा ओस पडल्या आहेत.त्यामुळे या खाडीपुलाचा परिणाम तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासावर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. वारंवार प्रशासन याबाबत केवळ आश्वासने देवून जनतेची दिशाभूल करीत असल्याने राजेश गमरे यांनी आपल्या बेमुदत उपोषणात हा तालुक्यातील जनतेच्या जीवनावर परिणाम करणारा महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे.तात्काळ या पुलावरून वाहतूक पूर्ववत करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी गमरे यांची मागणी आहे.तसेच पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी कोणासाठी सुरु आहे ? असा गंभीर प्रश्न राजेश गमरे यांनी उपस्थित केला आहे.

तर मंडणगड तालुक्यातील जनतेला व पर्यटकांना पेट्रोल व डिझेल चा तुटवडा वारंवार भासवला जात आहे. याची गंभीर चौकशी करून पेट्रोल व डिझेल जनतेला, शेतकऱ्यांना वेळेवर पुरविनेत यावे अशी मागणी गमरे यांनी केली आहे.

मंडणगड तालुक्यातील जनतेचे हाल राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. याबाबत अनेक राजकीय पक्ष व संघटना या फक्त इशारे व निवेदन देणे यांच्या पुरत्या मर्यादित राहिल्या आहेत.काहींनी तर सवंग लोकप्रियतेसाठी खाडीपुलावरून जलसमाधी घेण्याचा इशाराही प्रशासनाला दिला मात्र हा इशारा खाडीतच जिरला कि काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो अशी अवस्था विविध समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या तालुक्यातील जनतेची होत आहे.राजेश गमरे यांच्या बेमुदत उपोषणाचा धसका अनेक राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी घेतला असून त्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे यांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण व त्यांना जनतेतून मिळणारा वाढता पाठींबा यामुळे मंडणगड तालुक्यातील जनतेच्या पदरात काहीतरी पडेल हे मात्र नक्की.