
समोरून येणाऱ्या वाहनाला मार्ग देताना अरुंद रस्त्यावर अपघात
मालवण | प्रतिनिधी : कांदळगाव येथून मसुरेच्या दिशेने शीतपेय वाहतूक करत असलेला मसुरे येथील रिक्षा टेम्पो कांदळगाव गावकरवाडी येथे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या बाजूला शेतात पलटी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
दरम्यान, स्थानिकांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. चालकाला बाहेर काढले, त्याला किरकोळ दुखापत झाली होती. अपघातात गाडीतील काही बॉटल फुटून नुकसान झाले होते. अखेर स्थानिक ग्रामस्थानी सर्वांच्या प्रयत्नातून मोठ्या मेहनतीने टेम्पो रस्त्यावर आणला.
कांदळगाव मसुरे या मुख्य मार्गांवर अनेक वाहनांची रहदारी असते. मात्र अरुंद रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा या अपघाताच्या निमित्ताने समोर आला आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या निमित्ताने ग्रामस्थानी केली आहे.












