प्रवाशांना मिळाला दिलासा
रत्नागिरी | प्रतिनिधी : रेल्वे प्रवास जलद आणि स्वस्त असला तरीही तो सुरक्षित नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. या प्रवासात होणार्या चोऱ्यांमुळे अनेकदा प्रवाशांना आपल्या मौल्यवान वस्तूंना मुकावे लागले असून अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कोकण रेल्वे प्रवासात रेल्वे गाडीत होणार्या चोऱ्यांचे प्रमाणही सातत्याने वाढत होते. यावर वचक बसावा आणि चोरटा ताब्यात मिळावा यासाठी रत्नागिरी पोलीस गेले अनेक दिवस प्रयत्न करत होते. त्याला यश आले असून रत्नागिरीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका रेल्वेतील चोराला पकडून अटक केले आहे.
दिनेश कुमार ओमप्रकाश, (27 वर्षे, रा. छर्पिया, पोस्ट महुवार, रुर्धेली खुर्द, जि. बस्ती, राज्य उत्तर प्रदेश) असे या चोरट्याचे नाव असून त्याला रविवारी दिनांक 24/09/2023 रोजी मडगाव, गोवा राज्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश याने दोन्ह गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यामध्ये दि. 12/06/2023 रोजी, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात 15,499/- किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता तर राजापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 30/06/2023 रोजी दाखल गुन्ह्यात 20,000/- किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
रेल्वेतील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे या तपासाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी पथक तयार करू स्थानिक पोलीस स्थानकांसह समांतर तपास सुरू केलाआला व तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी रविवारी गोव्यात दिनेश कुमार ओमप्रकाश याला ताब्यात घेऊन अटक केले. तसेच त्याच्या डून 39200 रुपये किंमतीचे 04 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत व दोन्ही गुन्ह्यांतील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत रेल्वे प्रवासा दरम्याने चोरीच्या गुन्ह्यांमधील आतापर्यंत एकूण ₹66,699/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश याने रेल्वे प्रवासा दरम्यान आणखी चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास सुरू आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक श्री. अमोल गोरे, पोहवा विजय आंबेकर, पोहवा सागर साळवी, पोहवा योगेश नार्वेकर, पोना दत्तात्रय कांबळे व पोकॉ अतुल कांबळे यांचा समावेश होता.
आवाहन : रत्नागिरी मधील नागरिकांनी रेल्वे प्रवासा दरम्याने आपल्या मौल्यवान वस्तु जपून ठेवण्याची योग्य खबरदारी घ्यावी व अश्या प्रकारचे गुन्हे आपल्या आजूबाजूला घडत असतील तर तात्काळ 112 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा अस आवाहन धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी केले आहे.











