राजापूर (वार्ताहर): व्यवसायिक गाडयांचे इंजिन काम निघण्यासाठी धोकादायक केमिकलचा वापर करणारी टोळी राजापूरात कार्यरत असून या टोळीचा शोध घेवून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे राजापूर तालुका वाहन चालक-मालक संघटनेच्या वतीने राजापूर पोलिस निरिक्षक यांचेकडे करण्यात आली आहे.
राजापूर तालुका गाडी चालक-मालक संघटनेच्या दृष्टीक्षेपात काही गोष्टी आलेल्या आहेत. राजापूर तालुक्यातील बहुतांश गाडया व्यावसायाच्या दृष्टीकोनातून रस्त्यावर अथवा राजापूरच्या उघडया परिसरात उभ्या केलेल्या असतात. गेले वर्षभर राजापूर तालुक्यात अनेक गाडयांची अचानक इंजिने लॉक झालेल्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा कृतीमुळे गाडी मालकांना मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अशा प्रकारे गैरकृत्य करणारे टोळी राजापूरात कार्यरत असून त्यासंबंधी त्यांच्या बाबतीत असणारा उपद्रव कमी व्हावा व त्यांचेवर योग्य ती कडक कार्यवाही करण्यात यावी आणि राजापूर तालुक्यातील गाडी मालकांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर सुनिल भणसारी, अशफाक हाजू, कैलास कदम, उल्हास विचारे, जिलानी काझी, किरण तुळसवडेकर, रोहन गिरकर, समीर शिंदे, कैलास कोठारकर, विकास कोठारकर, प्रशांत नागरेकर, निखील कोठारकर, आदिनाथ नागरेकर, इस्माईल काझी, महेश नकाशे आदींनी सह्या केल्या आहेत.












