शेतकर्यांना कृषी विद्यापीठाकडून हवामानावर आधारित कृषी सल्ला
रत्नागिरी | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामधील काही ठिकाणी 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी वीज, ढगांचा गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
▪️या कालावधीत शेतात कीड व रोग नियंत्रणासाठी करण्यात येणारी फवारणीची कामे पाऊस नसताना किंवा पावसाची तीव्रता कमी असताना करून घ्यावीत.
▪️27, 28 आणि 29 सप्टेंबर या तीन दिवशी गाई, म्हशी इ. जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी पाण्याच्या ठिकाणापासून दूर बांधावीत.
▪️ज्या ठिकाणी हळवे भात पिक कापण्यासाठी तयार झाले असेल अशा ठिकाणी भात कापण्याची कामे पावसाचा अंदाज घेऊन करावीत. कापणी करताना भात शेतात न ठेवता ठराविक वेळेनंतर सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करावी. उत्पादित भात कोरडे आणि सुरक्षित ठिकाणी वाढवण्यासाठी पसरून ठेवावा.
▪️आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर शेंडे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने पालवीचे निरीक्षण करावं आणि प्रादुर्भाव दिसून येत असल्यास कीडग्रस्त शेंडे काढून अळीसह नष्ट करावेत. आंबा बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्याकडून बागेची साफसफाई करावी.
▪️अंबा आणि काजू झाडांवर खोड आणि उघडी मुळे यावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने किडीच्या प्रादुर्भावाकडे खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावं. खोडकिडीची कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावेत.
▪️नारळ बागेमधील किडीच्या नियंत्रणासाठी मृत माडाची खोडं काढून नष्ट करावीत. पाला पाचोळा गोळा करून बागेत स्वच्छ करावी.
हा कृषी सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करण्यात आला आहे. अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असा आवाहन करण्यात आला आहे.











